मडगाव : एएफसी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत आज फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर एफसी गोवाचा शेवटचा सामना संयुक्त अरब अमिरातच्या अल-वाहदा एफसी संघाशी होणार आहे. रात्री 10.30 वाजता हा सामना खेळविण्यात येईल.
मागील सामन्यात अल-वाहदा एफसी संघाने पहिल्या स्थानावर असलेल्या इराणच्या पर्सेपोलिस एफसी संघाला एकमेव गोलने पराभूत केले होते. सध्या एफसी गोवा संघाचे पाच सामन्यांतून 3 गुण झाले असून ते तिसऱया स्थानावर आहेत. पहिल्या टप्प्यात एफसी गोवा आणि अल-वाहदा एफसी यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत संपली होती.
अल-वाहदा एफसी संघाने मागील काही सामन्यात चांगली कामगिरी केली असून त्यांना स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत जाण्याची चांगली संधी आहे. आज एफसी गोवा संघाविरूद्ध त्यानी विजय मिळविला तर त्यांचे 6 सामन्यांतून 13 गुण होतात. पर्सेपोलिस एफसी संघाचे पाच सामन्यांतून 12 गुण झाले आहेत. त्यांचा सामना आज रात्री 8 वाजता कतारच्या अल-रय्यान एफसीविरूद्ध होईल. या स्पर्धेत विविध गटातील तीन उत्कृष्ट उपविजेते संघ उप-उपान्त्यपूर्व फेरीत जाऊ शकतात. गोव्यावर विजय मिळविला तर अमिरातच्या अल-वाहदा एफसी संघाला त्यात स्थान मिळण्याची शक्यता आहेत. या सामन्यात त्यांचा कप्तान इस्माईल मातरला निलंबित असल्याने हा सामना खेळायला मिळणार नाही.
हा आमचा स्पर्धेतील शेवटचा सामना आहे. आमचे खेळाडू जरी दमले असले तरी हा सामना आमच्यासाठी अतिमहत्वाचा आहे. मागील तीन आठवडे या स्पर्धेत आम्ही खेळत आहोत, असे यावेळी अल-वाहदा एफसीचे प्रशिक्षक इरीक टेन कॅट म्हणाले. एफसी गोवाला पराभूत करणे सोपे नसून आम्हाला या सामन्यात चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल, असे कॅट म्हणाले. हा सामना आमच्यासाठी खडतर असेल. आमचे दोन खेळाडू निलंबित आहेत. एफसी गोवाचा संघ पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळत असून ते सुद्धा पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील असतील, असे ते शेवटी म्हणाले. एएफसी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा प्रथमच खेळणाऱया एफसी गोवाने पर्सेपोलिस एफसीविरूद्धचा रिव्हर्स सामना वगळता खेळलेल्या सर्व पाचही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. मागील सामन्यात त्यांना शेवटच्या क्षणी विजयाने हुलकावणी दिली होती. स्पर्धेची आपली मोहिम विजयाने करण्याचा एफसी गोवा संघाचा निर्धार असेल. आम्ही अल-वाहदाविरूद्ध तीन गुणांची कमाई करण्यासाठीच खेळणार आहोत आम्ही हरलो किंवा सामना अनिर्णीत राहिला तर आम्हाला तिसरे स्थान मिळणार आहे व हे सर्व काही पर्सेपोलिस आणि अल-रय्यान यांच्या निकालावर असेल, असे फॅरांडो म्हणाले.