काली पूजेवरून मागितली मुस्लिमांची माफी
वृत्तसंस्था/ कोलकाता
बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसनने कोलकाता येथे काली मातेची पूजा केल्याप्रकरणी माफी मागितली आहे. युटय़ूबवरील स्वतःच्या वाहिनीद्वारे एक चित्रफित प्रसारित करत मागील आठवडय़ात पूजा करण्याप्रकरणी माफी मागत धार्मिक कट्टरवाद्यांसमोर एकप्रकारे शरणागती पत्करली आहे.
बांगलादेशच्या एका व्यक्तीने त्याला फेसबुकवर जीवे मारण्याची धमकी दिली होती. समाजमाध्यमांवर होत असलेल्या विरोधामुळे शाकिबने दबावाखाली येत मंगळवारी माफी मागितली आहे. असे पुन्हा घडणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
फिक्सिंगमुळे बंदी झेललेला शाकिब गुरुवारी कोलकाता येथे पोहोचला होता, तेथील बेलीघाट येथे त्याने कालीमातेची पूजा केली होती. शाकिब बांगलादेशात परतल्यावर सिलहट शहरातील मोहसीन तालुकदार या व्यक्तीने फेसबुक लाईव्हवर क्रिकेटपटूने मुस्लिमांचा अपमान केल्याचे म्हटले होते. तसेच शाकिबला मारण्यासाठी सिलहटहून ढाक्यात यावे लागले तर येईन, असेही त्याने म्हटले होते.
मी पुन्हा कोलकात्यात जाऊ इच्छिणार नाही, माझी कृती चुकीची असल्याचे वाटत असल्यास माफी मागतो असे शाकिबने चित्रफितीत म्हटले आहे. मी कुठलीच पूजा केलेली नाही. एक जागरुक मुस्लीम म्हणून मी असे करणार नाही असे शाकिबने सांगितले आहे.