वृत्तसंस्था / दुबई
किंग्स इलेव्हन पंजाब व सनराजयर्स हैदराबाद या दोन्ही संघांचे गोलंदाज फॉर्मसाठी झगडत असल्याने गुरुवारी या दोन संघांत होणाऱया आयपीएलमधील लढतीत त्यांना पॉवरहिटर फलंदाजांवरच विसंबून रहावे लागणार आहे. सामन्याची सुरुवात सायंकाळी 7.30 पासून होणार आहे.
गुणतक्त्यात पंजाब संघ तळाच्या स्थानावर असून पाचपैकी चार सामने त्यांनी गमविले आहेत. सनरायजर्स संघ त्यांच्यापेक्षा किंचित पुढे म्हणजे सहाव्या स्थानावर असून त्यांनी तीन सामने गमविले आणि दोन जिंकले आहेत. सलामीची भक्कम जोडी हे पंजाबचे बलस्थान असून कर्णधार केएल राहुलने जबरदस्त फॉर्म दाखविताना दोन अर्धशतके आणि एक शतक नोंदवले आहे. त्याचा साथीदार मयांक अगरवालनेही एक अर्धशतक व एक शतक नोंदवले आहे. या दोघांनीच आतापर्यंत संघाचा मोठा भार उचलला आहे. निकोलस पूरन आश्वासक वाटत आहे, पण मॅक्सवेलने अजून ‘आग’ ओतलेली दिसून आली नाही.
फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी पंजाबला सामने जिंकण्यात मात्र यश आलेले नाही. निष्प्रभ गोलंदाजी हे त्याचे प्रमुख कारण आहे. शमी वगळता त्यांच्या अन्य गोलंदाजांना बळी मिळविण्यात यश आलेले नाही आणि डेथ ओव्हर्समध्ये तर त्यांनी भरपूर धावाही दिल्या आहेत. राजस्थानविरुद्ध त्यांना 223 धावांचे संरक्षणही करता आले नाही. चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात तर त्यांना 10 गडय़ांनी एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला आहे. चेन्नईच्या सलामीवीरांनीच पंजाबचे 178 धावांचे आव्हान अगदी किरकोळ करून टाकले.
सनराजयर्सकडेही उत्तम आघाडी फळी असून बेअरस्टो, कर्णधार वॉर्नर, मनीष पांडे व केन विल्यम्सन हे आत्मविश्वास खचलेल्या पंजाबच्या गोलंदाजांवर हल्ला करून फायदा उठवण्याची अपेक्षा आहे. रविवारी झालेल्या सामन्यात सनरायजर्सला मुंबई इंडियन्सकडून 34 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मध्यफळीच्या अपयशामुळे सनरायजर्सला पहिल्या दोन सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे विल्यम्सनला संघात स्थान देत ही त्रुटी त्यांनी भरून काढताना एका अष्टपैलूला संघाबाहेर ठेवले आहे.
वॉर्नरने अभिषेक शर्मा व अब्दुल समद या युवा खेळाडूंवर पाचवा गोलंदाज म्हणून भरवसा दाखविला आहे.
अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर जखमी होणे हा मात्र त्यांच्यासाठी मोठा धक्का ठरला आहे. तो आता पूर्ण स्पर्धेतच खेळू शकणार नाही. त्याच्या गैरहजेरीत सनरायजर्सचे गोलंदाज झगडताना दिसून आले आहेत. टी. नटराजनचा अपवाद वगळता सिद्धार्थ कौल व संदीप शर्मा या पेसर्सनी भरपूर धावा बहाल केल्या आहेत. समददेखील मुंबईविरुद्ध महागडा ठरल्यामुळे वॉर्नरने विल्यम्सनचा ऑफस्पिन मारा दोन षटकासाठी वापरला होता. या सर्व बाबी विचारात घेता गुरुवारी नटराजन व स्टार स्पिनर रशिद खानवर जादा दडपण येणार आहे. मधल्या फळीत स्थिरता आणावी की गोलंदाजी मजबूत करावी, असा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. नबी किंवा फॅबियन ऍलेनला संधी देण्याचा विचार केल्यास त्यांना विल्यम्सनला संघाबाहेर ठेवावे लागणार आहे.
सनराजयर्स हैदराबाद : वॉर्नर (कर्णधार), बेअरस्टो, विल्यम्सन, मनीष पांडे, गोस्वामी, विराट सिंग, प्रियम गर्ग, साहा, समद, विजय शंकर, नबी, रशिद खान, होल्डर, अभिषेक शर्मा, बी. संदीप, संजय यादव, ऍलेन, पृथ्वी राज यारा, खलीद अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, स्टॅन्लेक, टी. नटराजन, बसिल थाम्पी.
किंग्स इलेव्हन पंजाब : केएल राहुल (कर्णधार), अगरवाल, कॉट्रेल, गेल, मॅक्सवेल, शमी, मुजीब उर रहमान, करुण नायर, नीशम, पूरन, पोरेल, अर्शदीप सिंग, एम. अश्विन, के.गौतम, हरप्रीत ब्रार, दीपक हुडा, जॉर्डन, सर्फराज खान, मनदीप सिंग, दर्शन नलकंडे, रवि बिश्नोई, सिमरन सिंग, जगदीश सुचित, तजिंदर सिंग, हार्डस व्हिलोएन.