कोल्हापूर/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचे कोल्हापुरात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी भारत माता की जय. चलो बुलावा आया है माता ने बुलाया है! या घोषणांनी ताराराणी चौक दणाणून गेला होता. सकाळी 10.15 वाजता सोमय्या यांचे ताराराणी चौकात आगमन झाले. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष भाजपचे राज्य कार्यकारी सदस्य महेश जाधव, कोल्हापूर जिल्हा भाजपा अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी सोमय्या यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी उपस्थित भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी ही पुष्पवृष्टी केली. यानंतर हॉटेल अयोध्या येथे सोमय्या काही क्षण थांबले नंतर ते अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी रवाना झाले. सोमय्या यांच्या जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर ते मुरगुड या मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. ताराराणी चौक, दाभोळकर कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, मिरजकर तिकटी मार्गे ते अंबाबाई असा त्यांचा प्रवास सुरू आहे.