ऑनलाईन टीम / चेन्नई :
देशात कोरोना महामारी अक्षरशः थैमान घालत आहे. रुग्ण वाढीच्या प्रमाणात किंचित घट होताना दिसत असले तरी दैनंदिन मृत्यूंची संख्या भीतीदायक आहे. या महामारी विरुद्धच्या लढाईत अनेक लोकांनी, कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. सोमवारी साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांनीही या महमारी विरुद्धच्या लढाईत सहभाग घेत मदत केली आहे.
रजनीकांत यांनी सोमवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांच्या कार्यालयात जाऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 50 लाख रुपये जमा केले आहेत.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना रजनीकांत म्हणाले की, कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी मी तामिळनाडू मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 50 लाख रुपयांची देणगी दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी सरकारने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
यापूर्वी रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत आणि तिचे पती विषागन यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी एक कोटी रुपयांची मदत केली होती. तर 13 मे रोजी रजनीकांत यांनी कोविशिल्डची दुसरी लस टोचून घेतली यावेळी सौंदर्या रजनीकांत यांच्यासोबत उपस्थित होती.
- अन्य कलाकारांचा देखील मदतीचा हात
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार सरकारच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यामध्ये सूर्या, कीर्ती आणि शिवकुमार यांनी सरकारला 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. तर दिग्दर्शक एआर मुर्गादौस, उदयनिधी स्टालिन आणि सुपरस्टार अजित यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 25 लाख रुपयांची देणगी दिली आहे.