अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचे आश्वासन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना संकटात भारताला अमेरिकेची शक्य तितकी सहाय्यता मिळेल, असे दिलासादायक आश्वासन अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी दिले आहे. त्यांनी गुरुवारी रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून हे आश्वासन दिले. अमेरिकेकडून भारताला कोरोना विरुद्धच्या लसीला पुरवठा केला जाईल असेही त्यांनी या चर्चेत स्पष्ट केले आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या अधिकाऱयांनी प्रसिद्ध केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीनीही ट्विटरच्या माध्यमातून यासंबंधी माहिती दिली आहे. लसींसाठी आवश्यक असणारा कच्चा माल अमेरिका भारताला पुरविते. त्यामुळे सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत अमेरिकेने भारताच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा फोन संपर्क कमला हॅरिस यांनी स्वतः पुढाकार घेऊन केला होता. याची आवर्जुन नोंद भारताने घेतली आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी यासाठी उपाध्यक्षा हॅरिस यांचे मनःपूर्वक आभार मानले असून तसा ट्विटर संदेश पाठविला आहे.
भरपूर लसी मिळतील
अमेरिकेने कोरोनाशी झुंझणाऱया विकसनशील देशांना मोठय़ा प्रमाणावर लसींचा पुरवठा करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. अशी योजना बनविण्यात आली असून अमेरिकेतील अनेक संस्थाही त्यात योगदान करणार आहेत. भारत हा या योजनेचा व्यापक लाभार्थी असेल. अमेरिकेकडून भारताला मोठय़ा प्रमाणात लसी मिळू शकतील, असे अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीतसिंग संधू यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. अमेरिका आणि भारत विविध क्षेत्रात एकमेकांशी दृढ सहकार्य करीत असून आरोग्य क्षेत्रही या सहकार्य कक्षेचा महत्त्वाचा भाग असेल असे कमला हॅरिस यांनी पंतप्रधान मोदी यांना स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले.