प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हय़ात मंगळवारी रात्री 10 वाजेपर्यत महिलेसह 11 पॉझिटिव्ह रूग्ण मिळून आले. यामध्ये हातकणंगले तालुक्यातील 3 शाहूवाडी 2 तर गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड, चंदगड तालुक्यातीर प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आजरा तालुक्यातील बावधन येथील वृद्धा अन सातारा जिल्हय़ातील मरळी (ता. पाटण) येथील तरूणाचा यात समावेश आहे. तरूणाने डोंबिवली, मुंबईंतून प्रवास केला आहे. त्यामुळे तो कोणाच्या संपर्कात आला, याचा शोध घेण्यात येत आहे. पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 841 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्तांची संख्या 720 झाली आहे.
परजिल्हय़ातून जिल्हय़ात आलेल्यांपैकी मंगळवारी सकाळी 10 पर्यत 982 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 143 जणांचे स्वॅब घेतले आहेत. संशयित 112 जणांना आयसोलेटेड केले आहे. तसेच 318 जणांचे स्वॅब रिपोर्ट मिळाले असून त्यात 6 जण पॉझिटिव्ह आले. यामध्ये चंदगड, हातकणंगले तालुक्यातील रूग्णांचा समावेश आहे. तसेच 310 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सायंकाळी 5 वाजेपर्यत दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यामध्ये बावधन (ता. आजरा) येथील 65 वर्षीय महिला आणि पाटण तालुक्यातील मरळी येथील तरूणाचा समावेश आहे. तरूणाने मुंबईतून सातारा जिल्हय़ापर्यत प्रवास केला आहे. त्याचा स्वॅब खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 841 वर पोहोचली आहे. एक कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 720 झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
जिल्हय़ात रात्री 9 वाजेपर्यत 2 हजार 125 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 465 जणांचे स्वॅब घेण्यात आले. संशयित 222 जणांना आयसोलेटेड केले आहे. तसेच 417 स्वॅब रिपोर्ट आले असून त्यापैकी 8 पॉझिटिव्ह आणि 406 निगेटिव्ह आले आहेत. दिवसभरात पाच जण कोरोनामुक्त झाल्याने ही संख्या 720 झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.
दरम्यान, रात्री दहा वाजता पॉझिटिव्ह आलेल्या 9 रूग्णांत इचलकरंजी गुरूकृपानगर येथील 35 वर्षीय पुरूष, कुडचे मळा येथील 25 वर्षीय महिला, 65 वर्षीय वृद्धा, गडहिंग्लज येथील 50 वर्षीय पुरूष, राधानगरी तालुक्यातील कुडाळवाडी येथील 24 वर्षीय तरूण, भुदरगड तालुक्यातील गंगापूर येथील 29 वर्षीय तरूण, शाहूवाडी तालुक्यातील आरूल येथील 29 वर्षीय पुरूष, परळे येथील 71 वर्षीय वृद्ध आणि चंदगड तालुक्यातील आडकूर येथील 37 वर्षीय पुरूषाचा समावे आहे. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 850 झाली आहे.