नरेश गावणेकर/ फोंडा
शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्राकडे आता उत्तम भवितव्याचे माध्यम म्हणून पाहिले जाते. नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्रा या भालाफेकपटूने जी सुवर्ण कामगिरी केली त्यामुळे देशी खेळाच्या आशाही उंचावल्या आहेत. खेळातून आपले भवितव्य घडवितानाच राष्ट्रभावना जोपासण्याचे स्वप्न युवापिढी प्रत्यक्षात आणू शकते हा आत्मविश्वास आता विविध खेळातून वाढू लागलेला आहे. क्रीडा भारती गोवासारखी संस्था सर्वसामान्य खेळाडूंच्या स्वप्नांना आकार देण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत आहे. 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा हा वाढदिवस. आजच्या या क्रीडा दिनी क्रीडा भारती गोवाच्या कार्याविषयी……!
पुरातन काळापासून खेळ हे सुदृढ आरोग्य कमावण्यासाठी व मनोरंजनाचे एक साधन होते. नंतरच्या काळात टीव्ही व इतर आधुनिक साधनामुळे मुले खेळापासून दूर जात राहिली. अभ्यासाकडे जास्त कल द्यावा म्हणून पालकांचेही त्यांच्यावर दुर्लक्ष होत राहिले. यामुळे मुलांमध्ये दुष्परिणाम होत राहिले. मुलांमध्ये लठ्ठपणा व मानसिक आजार होऊ लागले. अशा मुलांना परत मैदानाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच खेळाचा विकास व प्रगतीसाठी 24 एप्रिल 2004 रोजी हनुमान जन्मोत्सवादिवशी क्रीडा भारती गोवा या संस्थेची स्थापना झाली.
‘क्रीडा से निर्माण चारित्र्य का, चारित्र्य से निर्माण राष्ट्र का’ हे या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे. आजकाल तरुणांमध्ये मधुमेह व रक्तदाब, वृद्धांमध्ये संधीवात व इतर आजार दूर करण्यासाठी तसेच सर्व वयोगटातील लोकांनी स्वतःच्या आनंदासाठी काही ना काही खेळ खेळावा व तंदुरुस्त रहावे हा या संस्थेचा उद्देश आहे. गोव्यातील विद्यालयातील शारीरिक क्रीडा शिक्षक व इतर खेळांचे प्रशिक्षक यांना एकसंघ करुन क्रीडा भारतीचे कार्य पुढे नेण्यात येत आहे. कमीतकमी जागेत सर्वांना करता येण्यासारखा सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार म्हणजे सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. तसेच सामुदायिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात येत आहे. याबरोबरच योगासन, लंगडी, कबड्डी, खो-खो, मेराथॉन, व्हॉलीबॉल यांचे प्रशिक्षण व स्पर्धा आयोजित केल्या जातात. कारण खेळाची प्रगती होण्यासाठी स्पर्धा आयोजन करणे आवश्यक आहे.
मुलींसाठी खास व्हॉलीबॉल प्रशिक्षण
व्हॉलीबॉल खेळ मुली कमी खेळत असल्याचे दिसून आल्याने सर्व विद्यालयातील मुलींच्या संघांना निमंत्रित करुन त्यांच्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यातील कित्येक मुलींनी राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. काही महिला घर व नोकरी यांच्यातच गुंतून राहतात. अशा महिलांना खेळाची आवड निर्माण होण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य विषयक चर्चासत्र व क्रीडा स्पर्धा दरवर्षी घेण्यात येतात.
जिम्नेस्टिक खेळाचा विकास
जिम्नेस्टीकला सर्व खेळांची माता असे म्हटले जाते. गोव्यासाठी हा तसा नवीन खेळ प्रकार. या खेळाचा विकास होण्यासाठी क्रीडा भारतीतर्फे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच राज्यस्तरीय स्पर्धाही आयोजित करण्यात येतात. यातून निवडलेल्या खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर भाग घेऊन अनेक पदके प्राप्त केली आहेत.
दिव्यांग खेळाडूंची चमक
गोव्यातील दिव्यांग खेळाडू दुर्लक्षीत राहिल्याने त्यांना खेळात प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा भारतीने प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. यातून प्रशिक्षण घेतलेल्या मंगेश कुट्टीकरने पहिल्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भाग घेऊन भारतासाठी कांस्यपदक पटकावले. राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने अनेक पदके पटकावली. राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत गोपाळ कुंकळ्ळीकरने सलग तीन वर्षे कांस्यपदक प्राप्त केले. क्रूझ मरगुलांवने राष्ट्रीय पॉवर लिफ्टींगमध्ये सुवर्ण व कांस्यपदक पटकावले. लिंडन कार्दोझने राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. याशिवाय अनेक खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करुन आपल्यातील क्षमता दाखवून दिली.
अरीहंत स्पोर्ट्स अकादमीची सुरुवात
खेळाडूंना एकाच जागी विविध क्रीडा प्रकारातील प्रशिक्षणाचा लाभ मिळावा तसेच प्रशिक्षकांनाही आर्थिक लाभ व्हावा या उद्देशाने क्रीडा भारती गोवातर्फे फोंडा येथील स्व. बाबय प्रभू सभागृहात अरीहंत स्पोर्ट्स अकादमी सुरु केली आहे. याठिकाणी बॉक्सींग, तिरंदाजी, कराटे, ज्युडो, तायक्वांदो, स्कॅटिंग, योग, जिम्नेस्टीक, फिटनेस डान्स, एरोबिक्स, दोरी उडी, तलवारबाजी, जलतरण, बुद्धिबळ, टेबल टेनिस आदी खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. शंभरहून अधिक प्रशिक्षणार्थी या अकादमीत प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना राष्ट्रीय पातळीवरील पदक विजेते व एनआयएसचे प्रशिक्षक प्रशिक्षण देतात. ज्येष्ठ खेळाडूंसाठीही येथे टेबल टेनिस, बुद्धिबळ, चालणे आदी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते.
खेळाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण देण्याची योजना
पुढची पिढी चारित्र्यसंपन्न व्हावी व त्यांच्यात राष्ट्रप्रेम रुजविण्यासाठी खेळाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण देण्याची योजना असल्याचे क्रीडा भारती गोवाचे अध्यक्ष कर्नल मंगेश दाणी यांनी सांगितले. कबड्डी, लंगडी, खो-खो, लगोरी, दोरी उडी अशा देशी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येत आहे. येत्या काळात आधुनिक प्रशिक्षणाची सोय केली जाईल. जेणेकरुन गोव्यातील खेळाडू येणाऱया काळात ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करु शकतील, हे आमचे उद्दिष्टय़ आहे.
खेळासाठी आमच्या भरपूर योजना आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी काहीवेळा अडथळे येतात. यावर मात करुन खेळाच्या प्रगतीसाठी आम्ही आमचे उद्दिष्टय़ साध्य करण्यासाठी प्रयत्नरत राहणार. खेळाद्वारे सुदृढ, सक्षम समाज व देश घडविण्याचा प्रयत्न करीत राहू असे सचिव सुदेश ठाकूर यांनी सांगितले.