नगरसेविका डॉ. रोनिता आजगावकरकडून साबांखाचे आभार
प्रतिनिधी /मडगाव
मडगावातील गांधी मार्केटमधील अंतर्गत भागातील रस्त्यांचे रविवारपासून हाती घेतलेले हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून सार्वजनिक बांधकाम खात्याने दशकभरानंतर गांधी मार्केटमधील रस्त्यांना नवी झळाळी मिळवून दिल्याबद्दल स्थानिक प्रभाग 14 च्या नगरसेविका डॉ. रोनिता आजगावकर यांनी आभार मानले आहेत.
आपण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना घेऊन मे महिन्यात या रस्त्याची पाहणी केली होती व हॉटमिक्स डांबरीकरण करण्याबाबत आवश्यक सूचना केल्या होत्या. त्यानुसार काम झाल्याने डॉ. आजगावकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. मे महिन्याच्या पाहणीनंतर पावसाळय़ाला प्रारंभ झाल्याने सदर डांबरीकरणाचे काम पुढे ढकलणे भाग पडले होते. गांधी मार्केट प्रवेशद्वारावरून टी-कॉर्नर ते गांधी मार्केटला वळसा घालून सांबारी बूक स्टोअरपर्यंतचा सदर रस्ता वाहून गेला होता. काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यासाठी स्थानिक आमदाराने नारळ वाढविला होता. मात्र त्यानंतर प्रत्यक्षात काम सुरूच झाले नव्हते, असा दावा डॉ. आजगावकर यांनी केला.
गांधी मार्केट संघटनेचे सर्वेसर्वा असलेले बाबू आजगावकर हे उपमुख्यमंत्री असल्याने येथील फळभाजी व तयार कपडे विक्रेते संघटनेने त्यांच्या नजरेस हा विषय आणून दिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी साबांखाचे कार्यकारी अभियंता पाणंदीकर यांच्याकडे पाठपुरावा करून हे हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम मंजूर करून घेतले होते, असे सांगण्यात आले आहे.