राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या हस्ते पद्मपुरस्कारांचे वितरण
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळय़ात काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेक मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. पद्म पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन शेणींमध्ये प्रदान करण्यात येतात. सोमवारी देघांना पद्मविभूषण, आठ जणांना पद्मभूषण आणि 54 जणांना पद्मश्रीने गौरविण्यात आले.
सीडीएस जनरल बिपिन रावत (मरणोत्तर) आणि गीता प्रेसचे अध्यक्ष राधे श्याम (मरणोत्तर) यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. राधे श्याम खेमका यांना हा पुरस्कार साहित्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रातील योगदानाकरता देण्यात आला. राष्ट्रपतींनी खेमका यांचे पुत्र कृष्णकुमार यांना हा पुरस्कार प्रदान केला. तर जनरल बिपिन रावत यांच्या कन्या कृतिका आणि तारिणी यांनी रावत यांना जाहीर झालेला पुरस्कार स्वीकारला आहे.
काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, पंजाबी लोकगायक गुरमीत बावा (मरणोत्तर) , टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, माजी कॅग राजीव महर्षी, सीरम इन्स्टीटय़ूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांच्यासह अनेक मान्यवरांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले आहे.
पद्म पुरस्कार विविध विषय आणि क्षेत्रे म्हणजेच सामाजिक कार्य, कला, विज्ञान, इंजिनियरिंग, व्यापार, उद्योग, वैद्यकीय, साहित्य, शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादींमधील योगदानासाठी देण्यात येतात. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा केली जाते.
यंदा एकूण 128 पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. पुरस्कार विजेत्यांमध्ये 34 महिलांचा समावेश आहे. तर मरणोत्तर पुरस्कार विजेत्यांमध्ये 13 जण सामील आहेत. विदेशी, एनआरआय, पीआयओ, ओसीआयच्या श्रेणीत 10 जणांचा समावेश आहे. पद्म पुरस्कार वितरणाचा दुसरा सोहळा 28 मार्च रोजी आयोजित होणार आहे.
126 वर्षीय स्वामी शिवानंदांच्या सन्मानार्थ झुकले सरकार
योगसाठी पद्मश्रीने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
वाराणसीचे 126 वर्षीय स्वामी शिवानंद अनवाणी पायांनी पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी पोहोचले, परंतु पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी पंतप्रधान मोदींना नमस्कार करण्यासाठी ते खाली वाकल्यावर सभागृहातील वातावरण भावुक झाले. शिवानंद यांचा हा भाव पाहून पंतप्रधान मोदींनी देखील सन्मानार्थ वाकून त्यांना नमस्कार केला. स्वामी शिवानंद यांना भारतीय जीवनपद्धत आणि योगच्या क्षेत्रात विशिष्ट योगदानासाठी पद्मश्रीने गौरविण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनात 126 वर्षीय स्वामींनी स्वतःच्या तंदुरुस्तीद्वारे सर्वांना चकित केले.