प्रतिनिधी /पणजी
ज्येष्ठ गोमंतकीय मराठी साहित्यिक रामदास प्रभू यांनी संपादित केलेल्या ‘गोमंत शारदा’ या दुर्मीळ गंथाच्या दुसऱया आवृत्तीचा प्रकाशन सोहळा शनिवार दि. 27 रोजी सायं. 5 वा. पणजी येथील इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. गोवा मराठी अकादमीच्यावतीने प्रकाशित होणाऱया ‘गोमंत शारदा’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळय़ाला सध्या मुंबई येथे वास्तव्य असलेले संपादक रामदास प्रभू हे उपस्थित राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून पत्रकार परेश प्रभू हे या पुस्तकावर विवेचन करणार आहेत.
‘गोमंत शारदा’ या ग्रंथात 1526 ते 1965 पर्यंतच्या वैभसंपन्न गोमंतकीय मराठी काव्य परंपरेचा समावेश केला असून या कलाखंडातील कवी आणि त्यांचे काव्य या विषयावर रामदास प्रभू यांनी अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. अथक परिश्रम, संशोधन आणि चिकाटीच्या बळावर रामदास प्रभू यांनी गोमंतकीय मराठी काव्याचे गुप्तधन शोधून मराठीच्या अभ्यासकांसाठी एक अनमोल संदर्भग्रंथ निर्माण केला आहे.
माशे, काणकोण येथे जन्मलेले आणि सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले रामदास प्रभू हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून लेखक, कवी, समीक्षक, संपादक, समाजसेवक, पर्यावरणप्रेमी, पुष्परचनाकार हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष पैलू सर्वांना परिचित आहेत. गोमंतकीय मराठी साहित्यातील एका मौलिक संदर्भग्रंथाच्या प्रकाशन सोहळय़ास साहित्यिक आणि वाचकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी केले आहे.