प्रतिनिधी/खेड :
तालुक्यातील धामणदेवी येथे झालेल्या घरफोडीप्रकरणी येथील पोलिसांनी हस्तगत केलेले 3 लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने न्यायालयाच्या आदेशानुसार इब्राहिम अब्दुला फिरफिरे यांच्याकडे मंगळवारी सुपूर्द करण्यात आले. 16 नोंव्हेबर 2019 रोजी झालेल्या घरफोडीनंतर पोलिसांनी तिघांना जेरबंद केले होते.
धामणदेवी येथील इब्राहिम फिरफिरे यांचे चोरटय़ांनी घरफोडून 3 लाखाच्या सोन्याच्या दागिन्याचा ऐवज लंपास केला होता. घरी परतल्यानंतर दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवल्यानंतर अज्ञात चोरटय़ांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांनी गोपनीय खबऱयांकडून चोरटय़ांच्या ठावठिकाणाबाबत माहिती प्राप्त करत अजिंक्य मोहिते, दीपक लिल्हारे, सैफ काझी या तिघांना गजाआड केले होते.
घरफोडीप्रकरणी तिघांना अटक केल्यानंतरही चोरलेल्या दागिन्यांबाबत चोरटे काहीच माहिती देत नव्हते. अखेर पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांनी गुन्हय़ाचा शास्त्रीय व तांत्रिक तपास केला. घरफोडीनंतर चोरटय़ांनी ठाणे जिल्हय़ातील डोंबिवली येथे काही दिवस वास्तव केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. यादरम्यान, चोरटय़ांनी सोन्याचे दागिने डोंबिवली येथील एका सराफाकडे तारण ठेवल्याचे व काही दागिने मित्राकडे ठेवल्याची कबुली दिली होती.
डोंबिवलीतील पोलिसांच्या मदतीने येथील पोलिसांनी सराफासह चोरटय़ांच्या मित्राचा शोध घेत घरफोडीतील 3 लाखाचे दागिने हस्तगत केले होते. घरफोडीतील सोन्याचे दागिने फिर्यादी इब्राहिम फिरफिरे यांच्या सुपूर्द करावेत, असे आदेश येथील न्यायालयाने पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्याहस्ते हस्तगत केलेले सर्व दागिने फिर्यादीकडे सुपूर्द करण्यात आले.