ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मंगळवारी 4878 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 74 हजार 761 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, त्यातच दिलासादायक बाब म्हणजे मागील चोवीस तासात 1951 कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 90 हजार 911 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 50.2 टक्के असून मृत्यूचे प्रमाण 4.49 इतके आहे. सध्या राज्यात 75,979 सक्रिय रुग्ण आहेत.
मंगळवारी राज्यात 245 मृत्यूंची नोंद झाली. त्यातील 95 मृत्यू हे मागील 48 तासातील आहेत, तर अन्य 150 मृत्यू मागील काळातील आहेत. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 7,855 वर पोहोचला आहे.
दरम्यान, आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 9 लाख 66 हजार 723 नमुन्यांपैकी 1 लाख 74 हजार 761 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 78 हजार 33 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 38 हजार 866 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.