चिपळूण
फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱया नायट्रोजनयुक्त गॅस सिलिंडरचा एक व्हॉल्व तुटून झालेल्या स्फोटात एक फुगे विक्रेता जखमी झाला. ही घटना शहरातील गोवळकोट रोडवरील आसरा सहारा अपार्टमेंटमधील एका सदनिकेत रविवारी सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. दरम्यान, या स्फोटानंतर सिलिंडर उडाल्याने सदनिकेच्या सिलिंगला तडे गेले आहेत.
शहरातील गोवळकोट रोडवरील या अपार्टमेंटमध्ये परप्रांतीय भाडय़ाने रहात असून ते लहान मुलांच्या खेळण्यासाठी वापरले जाणारे फुगे फुगवून त्याची विक्री करतात. हे फुगे फुगवण्यासाठी नायट्रोजनयुक्त गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. हा सिलिंडर त्या अपार्टमेंटच्या सदनिकेत ठेवण्यात आला असता त्या सिलिंडरचा व्हॉल्व तुटून मोठा आवाज होऊन त्याचा स्फोट झाला. या स्फोटाच्या मोठय़ा आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला अधिक उपचारासाठा एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती चिपळूण पोलिसांना समजताच ते घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी हा सिलिंडर जप्त केला आहे. या घटनेची कार्यवाही उशिरापर्यंत सुरु असल्याने जखमीची अधिक माहिती मिळू शकली नाही.