पाटणा : ऑनलाईन टीम
बिहारच्या राजकारणात उलथापालथी सुरु आहेत. लोकजनशक्ती पक्षाचे नेते आणि खासदार चिराग पासवान यांना आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे. काका पशुपती पारस यांनी त्यांना पक्षातून बेदखल केलं आहे. चिराग पासवान यांच्या जागी सूरजभान यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे.
लोकजनशक्ती पक्षाचे 6 खासदार आहेत. दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे बंधू पशुपती पारस यांनी 5 खासदारांसह बंड पुखारलं आहे. पाचही खासदारांनी पशुपती पारस यांना आपला नेता मानलं आहे. इतकंच नाही तर लोकसभेत संसदीय नेते म्हणूनही चिराग यांच्या जागी पारस यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे चिराग पासवान एकाकी पडले आहेत.
काका पशुपती पारस यांनी केलेली बंडखोरी आणि इतर नेत्यांकडून त्याला मिळालेली साथ याचा चिराग पासवान यांना मोठा धक्का बसला आहे. चिराग पासवान यांनी घडलेल्या प्रकारवार मौन सोडत प्रथमच भाष्य केलं आहे. यासंदर्भात त्यांनी भावनिक ट्वीट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
चिराग पासवान यांनी यासंदर्भात ट्विट करत म्हटले आहे की, माझ्या वडिलांनी स्थापन केलेला हा पक्ष आणि माझ्या कुटुंबाला एकजूट ठेवण्याचा प्रयत्न मी केला. मात्र त्यात मी अयशस्वी ठरलो. पक्ष हा आई समान असतो. त्यामुळे आईची फसवणूक करता कामा नये. लोकशाहीमध्ये जनता ही सर्वोपरी असते. पक्षावर विश्वास ठेवणाऱ्यांचे मी आभार मानतो, असे म्हणत त्यांनी काका पशुपती पारस यांना लिहिलेली काही पत्रे शेअर केली आहेत.