वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱया डर्बीशायर क्लबच्या क्रिकेट प्रमुखपदी आंतरराष्ट्रीय प्रख्यात प्रशिक्षक मिकी आर्थर यांची नियुक्ती झाली आहे. प्रशिक्षण क्षेत्रात मिकी आर्थर हे जगातील अव्वल क्रिकेट प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात.
ंमिकी आर्थर यांनी आपल्या प्रशिक्षण कारकीर्दीत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून योगदान दिले आहे. डर्बीशायर क्लबच्या क्रिकेट प्रमुखपदाची सूत्रे यापूर्वी डेव्ह हॉटन यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यांचा डर्बीशायर बरोबरचा करार 2021 क्रिकेट हंगामाअखेर संपणार असून आता त्यांच्या जागी मिकी आर्थर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डर्बीशायरच्या क्रिकेटपटूंना आता मिकी आर्थर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
2005 ते 2010 या कालावधीत मिकी आर्थर हे दक्षिण आफ्रिका संघाचे यशस्वी प्रमुख प्रशिक्षक म्हणून नावारुपास आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण आफ्रिकेने या कालावधीत ऑस्ट्रेलिया, भारत आणि पाक संघावर मालिका विजय मिळविले. या कालावधीनंतर मिकी आर्थर यांनी ऑस्टेलियन क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. मिकी आर्थर यांच्या मार्गदर्शनाखाली पाक क्रिकेट संघाने 2017 साली आयसीसीची पहिल्यांदा चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. राष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिकी आर्थर यांनी दक्षिण आफ्रिकेतील इर्स्टन केप संघाला दोनवेळा टी-20 स्पर्धेचे उपजेतेपद मिळवून दिले. 2020 फेब्रुवारीमध्ये लंकन संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी आर्थर यांची नियुक्ती करण्यात आली होती.