प्रतिनिधी/ पणजी
अपक्ष विजयी झालेले डिचोलीचे नगरसेवक निलेश टोपले यांनी शुक्रवारी भाजपात रितसर प्रवेश केला. त्यांच्यासह अन्य अनेक कार्यकर्त्यांनीही यावेळी पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी त्यांना सदस्यत्वाची पावती व पुष्पगुच्छ सुपूर्द करत पक्षात स्वागत केले.
पणजीतील भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमास त्यावेळी डिचोली मतदारसंघ अध्यक्ष विश्वास गावकर, डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी आणि इतरांची उपस्थिती होती. भाजप पुरस्कृत मंडळाची सत्ता असलेल्या डिचोली पालिकेत 14 पैकी 9 सदस्य भाजपचे तर तीन विरोधी व एक अपक्ष यांचा समावेश आहे. अपक्ष असलेले टोपले यांनाही भाजपने ऑफर दिली होती. त्यानुसार स्थानिक आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. या टीमच्या प्रवेशामुळे डिचोलीत भाजपचे पारडे अधिक जड झाले आहे, असे सांगून तानावडे यांनी त्यांचे स्वागत व अभिनंदन केले.
डिचोलीची उमेदवारी पाटणेकर यांनाच ः तानावडे
दरम्यान, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, डिचोली मतदारसंघात विद्यमान आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर हेच भाजप उमेदवार असतील, असे तानावडे यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या उमेदवारीसाठी सध्या प्रत्येक मतदारसंघात इच्छुक व दावेदारांची संख्या वाढत आहे. डिचोलीतही तसाच प्रकार आहे का? असे विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. निवडणुकीस अद्याप सात महिने शिल्लक आहेत. पक्ष मोठा होत जातो तसतशी इच्छूक व दावेदारांची संख्याही वाढत जाते. त्यामुळे भविष्यात डिचोलीतही अन्य कुणी दावा करूही शकतो. सध्यातरी तसे चित्र नाही, असे ते म्हणाले.
त्याचबरोबर भाजप प्रवेश केलेले श्री. टोपले यांनीही आपण उमेदवारीसाठी दावा करणार नाही, असे स्पष्ट केले. आपण भाजपात प्रवेश करण्यासाठीच एवढा कालावधी घेतला तेथे उमेदवारीसाठी दावा करण्याचा प्रश्नच येत नाही. विद्यमान आमदाराचे मतदारसंघात भरीव काम सुरू असून आपण त्यावर समाधानी आहे. त्यामुळे पक्ष आणि सरकारच्या मदतीने मतदारसंघातील विकासकामे करता यावी याच एकमेव उद्देशाने पक्षप्रवेश केला आहे, असेही ते म्हणाले.
उमेदवारी कुणाला द्यावी हे पक्षासाठी महत्वाचे नाही. त्याची जिंकण्याची क्षमता किती आहे हे महत्वाचे आहे. ती क्षमता पाहूनच एखाद्याच्या नावाचा विचार करण्यात येतो. त्यानुसार एखाद्या नावास अंतिम मान्यता ही केंद्राकडून देण्यात येते. त्यामुळे स्वयंघोषित उमेदवार कुणीच बनू नये, अशा सूचना आम्ही प्रत्येकाला दिलेल्या आहेत, असे तानावडे म्हणाले.