प्रतिनिधी / पणजी
बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर 500 खाटा घालून कोविड केअर सेंटर बनविण्यात आले आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी तेथे जाऊन पाहणी केली आणि ते सेंटर लवकरच कोविड रुग्णांसाठी सुरू करणार असल्याचे सांगितले.
गोव्यात कोविड 19 म्हणजेच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी हे कोविड सेंटर सुरू करण्याचे ठरवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तेथील सर्व सोयी सुविधा नीट आहेत की नाहीत याचा आढावा त्यांनी घेतला. स्थानिक आमदार व महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्यासमवेत पुन्हा एकदा या कोविड सेंटरला भेट देऊन नंतरच ते खुले करणार असल्याचे राणे म्हणाले. त्यांच्यासमवेत आरोग्य खाते संचालक ज्यो डिसा, उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई, आरोग्य उपसंचालक गीता काकोडकर व इतर डॉक्टर्सवर्ग यांची उपस्थिती होती. त्या सर्वांनी फिरुन सेंटरची पाहणी केली आणि काही त्रुटी असतील तर त्या लक्षात आणून देण्याची सूचना राणे यांनी केली.
त्या सेंटरात 500 रुग्णांची सोय करण्याची क्षमता असून प्रामुख्याने तिसवाडीतील रुग्णांना तेथे पाठवण्यात येईल आणि तिथे त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली.