प्रतिनिधी / सातारा
कोरोनाची जिल्ह्यात बाधित होण्याचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. शनिवारचा दिवस जिल्ह्यातील जनतेसाठी दिलासादायक असा ठरला आहे. जिल्ह्यातील 540 जण नव्याने बधित आढळून आले आहेत. बाधित आढळून आलेल्या 540 मध्ये सातारा तालुका आघाडीवर असून पाटण, महाबळेश्वर आणि जावली हे तीन तालुक्यात एका अंकावर बाधित संख्या आढळून आली आहे. मृत्यू दर ही एकदम खाली आला असून दिवसभरात केवळ दोन जण कोरोनामुळे बळी गेले आहेत. तर लसीकरण शनिवारी दिवसभरात 12 हजार 869 जणांनी घेतले. सगळ्यात जास्त सातारच्या गोडोलीत तर सगळ्यात कमी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नाटोशीत केवळ एकाला टुचुक झाले आहे.
जावली, पाटण, महाबळेश्वर एक अंकावर
पहिल्या लाटेत जावली तालुक्यातील गावागावात कोरोनाची वाढ झपाट्याने होत होती. त्यामुळे भीती निर्माण झाली होती. आता दुसऱ्या लाटेत प्रत्येक जण काळजी घेत असल्याने जावलीमधील रुग्ण संख्या नियंत्रणात येत आहे. जो तालुका पर्यटनाचा आहे त्या महाबळेश्वर तालुक्यातील अनलॉकनंतर पर्यटन वाढले असले तरी सर्व ती काळजी महाबळेश्वर तालुक्यातील व्यवसायिक, व्यापारी घेत असल्याने येथील रुग्ण संख्या आटोक्यात आली आहे. पाटण तालुक्यात डोंगर कपाऱ्यात पहिल्याच लाटेत कोरोना पोहचला होता. ग्रामीण रुग्णालयात जागा नसायची आता ज्या प्रमाणात टेस्ट होतात त्या प्रमाणात रुग्ण संख्या खूप कमी आढळून येत असल्याने दिलासादायक आहे.
फक्त एकालाच गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नाटोशीत टुचुक
सातारा जिल्ह्यात शनिवारी 125 शासकीय व 27 खाजगी अशा 152 लसीकरण केंद्रावर 12 हजार 869 जणांना टुचुक झाले. आतापर्यंत 17 लाख 57 हजार 200जणांना टुचुक झाले. आज दिवसभरात गोडोली केंद्रात 443, कस्तुरबा केंद्रात 426, ग्रामीण रुग्णालय वाई 414 जणांना टुचुक झाले तर सगळ्यात कमी पाटण तालुक्यातील नाटोशी या केंद्रात फक्त 1 एकास टुचुक झाले.
सातारा, कराड आणि फलटण अजून चिंताजनक
जिल्ह्यातील दोन तालुके सतत डेंजर राहिले आहेत ते म्हणजे सातारा आणि कराड. सातारा तालुक्यातील मोठ्या गावाबरोबर शहरात ही आता कोरोनाची काळजी प्रत्येक जण घेत असला तरीही संख्या कुठे वाढते ही बाब चिंतेची आहे. कराड तालुक्यातील शहरी भागात रुग्ण संख्या आहेच पण त्याच बरोबर शहरालगतच्या भागात रुग्ण संख्या आढळून येत आहे. नागरिक काळजी घेत असल्याने रुग्ण संख्या कमी होत आहे.
सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 4 (9795), कराड 99 (37705), खंडाळा 14 (13784), खटाव 83 (24063), कोरेगांव 55 (20877), माण 43 (16721), महाबळेश्वर 2 (4581), पाटण 9 (9918), फलटण 88 (34514), सातारा 105 (48029), वाई 24 (15312) व इतर 14 (1890) असे आज अखेर एकूण 238189 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (215), कराड 2 (1158), खंडाळा 0 (192), खटाव 0 (594), कोरेगांव 0 (455), माण 0 (377), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0 (365), फलटण 0 (673), सातारा 0 (1438), वाई 0 (358) व इतर 0 (78), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5991 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
585 जणांना दिला आज डिस्चार्ज
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 585 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
शनिवारी
बाधित – 540
मृत – 2
मुक्त – 585
शनिवारपर्यंत
एकूण नमूने – 17, 60, 654
एकूण बाधित – 2, 38,189
घरी सोडण्यात आलेले – 2, 26, 203
मृत्यू -5, 991
उपचारार्थ रुग्ण- 9, 339