महापालिकेचा कानाडोळा : स्वच्छतेसह दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक : क्रीडापटूंसाठी सुविधा उपलब्ध करणे गरजेचे
प्रतिनिधी /बेळगाव
क्रीडापटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी लेले मैदानावर (सुभाष चंद्रबोस मैदान) विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र मैदानाची देखभाल महापालिकेकडून केली जात नसल्याने या ठिकाणी उभारण्यात आलेल्या गॅलरीची दुरवस्था झाली आहे. तसेच या परिसरात झाडे-झुडुपे वाढत असल्याने देखभालीची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
महापालिकेच्यावतीने क्रीडापटूंसाठी विविध ठिकाणी असलेल्या मैदानांचा विकास केला आहे. शहर आणि उपनगरांत मोठी मैदाने असून यामध्ये अशोकनगर येथील क्रीडा संकूल, सरदार्स हायस्कूल ग्राऊंड, व्हॅक्सिन डेपो ग्राऊंड, संभाजी उद्यान आणि लेले मैदान अशा विविध मैदानांचा समावेश आहे. या ठिकाणी क्रीडापटूंसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरदार्स हायस्कूल मैदान, अशोकनगर येथील क्रीडा संकूल आदी ठिकाणी मुख्यमंत्री शहर विकास अनुदानातून विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रेक्षक गॅलरी तसेच अशोकनगर येथे जलतरण तलाव, व्यायामशाळा, बॅटमिंटन हॉल आणि सरदार्स हायस्कूल मैदानावर व्यापारी संकुलाची उभारणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लेले मैदान येथे प्रेक्षक गॅलरीसह फ्लडलाईटची उभारणी करण्यात आली आहे. तसेच संभाजी उद्यान येथेही स्टेज आणि प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे.
महापालिकेच्यावतीने या सुविधा उपलब्ध करण्यात आल्यानंतर देखभालीकडे कानाडोळा केला आहे. परिणामी सर्वच मैदानांची दुरवस्था झाली आहे. कोरोनाकाळात क्रीडा उपक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे क्रीडापटू मैदानाकडे फिरकले नाहीत. मात्र अलीकडे विविध क्रीडा उपक्रम घेण्यात येत असल्याने मैदानांची स्वच्छता व दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक आहे. मात्र महापालिका प्रशासन आणि युवजन क्रीडा विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. महापालिकेच्या अखत्यारित येणाऱया मैदानांवर अस्वच्छता निर्माण झाली आहे. लेले मैदान येथे प्रेक्षक गॅलरीचा वापर रात्रीच्यावेळी मद्यपानासाठी केला जात असल्याची टीका नागरिक करीत आहेत. याठिकाणी कचरा टाकला जात असून प्रेक्षक गॅलरीभोवती झाडे-झुडुपे उगवत आहेत. तसेच येथील काही दिवे बंद
आहेत.
संभाजी उद्यान मैदानाचे प्रवेशद्वार खराब
महाद्वार रोड, संभाजी उद्यानातील मैदानाची दुरवस्था झाली आहे. मैदानाचे प्रवेशद्वार खराब झाले असून मैदानाची स्वच्छता केली जात नाही. परिसरातील क्रीडापटू सरावासाठी येत असतात. काही वृद्ध नागरिक सायंकाळच्यावेळी फिरण्यासाठी मैदानात येतात. पण येथील अस्वच्छतेमुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सरदार्स स्कूल मैदानावरील व्यापारी संकुलात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या मैदानाची देखभाल करण्यात यावी, तसेच क्रीडापटूंसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.