बाजारभोगाव / प्रतिनिधी
नातेवाईकांसह रविवारची सुट्टीचा आनंद घ्यायला आलेले दोघेजण पडसाळी (ता.पन्हाळा ) येथील लघुपाटबंधारे तलावात पोहताना बुडाले आहेत. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने लहान मुलासह एका तरूणाचा दुर्दैवी अंत झाला आहे.. ओम महेश गांजवे (वय १३ रंकाळा टॉवर कोल्हापूर) व ऋषीकेश नंदकुमार होगाडे (वय २७ रा- इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत
याबाबत पोलिसांच्याकडून समजलेली माहिती अशी गांजवे व होगाडे हे पाहुणे असून कुटुंबातील दहाबारा सदस्य पडसाळी तलाव येथे रविवार ची सुट्टी घालण्यासाठी आले होते. तलावाशेजारी चुल मांडून महिला स्वयंपाक करत होत्या. तर तलावाच्या पाण्यात पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ओम व ऋषीकेश हे खोल पाण्यात बुडाले. यावेळी त्यांचा आरडाओरडा ऐकून इतर सदस्यांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला . पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ही घटना आज दुपारी अडीजच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती समजताच कळे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रमोद सुर्वे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अंधार पडेपर्यत मृतदेह न सापडल्याने शोध मोहीम थांबवली असून सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात येणार आहे.