दक्षिण 24 परगण्यातील प्रकार-हिंसाचार फैलावण्याचा होता कट
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्हय़ात 180 क्रूड बॉम्ब मिळाले आहेत. निवडणुकीच्या दिवशी हिंसाचार फैलावण्याचा कट रचण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हे सर्व बॉम्ब भांगडा येथील तारदहिया गावातून हस्तगत करण्यात आले आहेत. बॉम्बसंबंधी गुप्त माहिती मिळाली होती. त्वरित या बॉम्बना निष्क्रीय करण्यासाठी पथकाला पाचारण करण्यात आल्याच माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे उपअधीक्षक तमाल सरकार यांनी दिली आहे. चालू महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे.
हे बॉम्ब नेमके कुठून आले याचा शोध पोलीस घेत आहेत. निवडणुकीदरम्यान बंगालमध्ये मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार होण्याची शक्यता असल्याने निवडणूक आयोगाने 8 टप्प्यांमध्ये मतदान करविण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील पहिल्या टप्प्यातील सर्व मतदान केंद्रे संवेदनशील असून तेथे केंद्रीय सुरक्षा बल तैनात करण्यात येणार आहे. केंद्रीय सुरक्षा दलांना तैनात केल्याने स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक निश्चित होणार आहे. 27 मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानात केंद्रीय सुरक्षा दलांच्या किमान 415 तुकडय़ांना तैनात करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. मागील एक वर्षापासून राज्यात हिंसाचार वाढला असून आयोग यावरून चिंतेत आहे.