पंतप्रधान नरेंद्र मोदींची सूचना : 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक
नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
देशाच्या अनेक राज्यांमध्ये सद्यकाळात पुरामुळे संकट निर्माण झाले आहे. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आहे. पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती पंतप्रधानांनी आसाम, बिहार, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून जाणून घेतली आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी पूरनियंत्रणासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना केली आहे.
पुराचा पूर्वानुमान आणि इशारा प्रणालीत सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या व्यापक वापरावर पंतप्रधानांनी भर दिला आहे. सर्व केंद्रीय आणि राज्य यंत्रणांमध्ये उत्तम समन्वय राखून पुराच्या पूर्वानुमानासाठी एक कायमस्वरुपी प्रणाली निर्माण केली जावी असे त्यांनी सुचविले आहे. बैठकीत पूर रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर विस्ताराने चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीत संरक्षणमंत्री, आरोग्यमंत्री, दोन्ही गृहराज्यमंत्री आणि संबंधित केंद्रीय मंत्रालये आणि यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले.
मदतनिधीची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करून अतिवृष्टी तसेच पुरामुळे राज्यात झालेल्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्री तसेच संबंधित मंत्र्यांनी दिली आहे. तसेच राज्यांनी केंद्राकडून मदतनिधीची मागणी केली आहे. एसडीआरएफचा प्रलंबित निधी लवकरात लवकर उपलब्ध करण्याची मागणीही संबंधित राज्यांनी केली आहे.
बिहारमध्ये मोठे संकट
बिहारमध्ये अतिवृष्टीमुळे सर्व प्रमुख नद्यांना मोठा पूर आला आहे. पुरामुळे 16 जिल्हय़ांमधील सुमारे 70 लाख लोकसंख्या प्रभावित झाली आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके सातत्याने मदत तसेच बचावकार्य करत आहेत. तर नितीश कुमार सरकारने पूरग्रस्त कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये 6 हजार रुपये जमा केले आहेत. तर एनडीआरएफने पुरात अडकून पडलेल्या 11 हजारांपेक्षा अधिक लोकांना वाचविले आहे.
आसामातही पूर
आसामच्या 30 जिल्हय़ांच्या 45 लाखांपेक्षा अधिक लोक पुराने प्रभावित झाले आहेत. पूरामुळे स्थिती बिघडल्यापासून सातत्याने बचावमोहीम राबविली जात आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा 80 टक्क्यांपेक्षा अधिक भाग जलमय झाला आहे. पुराच्या तावडीत सापडल्याने अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे.