पर्वरीतील घटना, संशयिताचे पलायन, परिसरात खळबळ
प्रतिनिधी / पर्वरी
साल्वादोर दु मुन्दू पंचायत क्षेत्रातील तोर्ड पाटो येथे रस्त्यावर वाहन अडवून अज्ञाताने एका वाहनचालकावर वाहनात बसलेल्या जागीच पेट्रोल मिश्रीत द्रव्य टाकून आग लावून पेटविले. त्याच्या अंगावरील कपडय़ांनी पेट घेतल्याने सदर चालकाने शेतात उडी घेत जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरून ये-जा करणाऱया लोकांनी आरडाओरड केल्यानंतर संशयिताने घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
या पूर्वनियोजित कटामुळे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव विलास मेथर असून तो चावडेवर धनवाडी येथे फ्लॅटमध्ये रहातो, अशी माहिती प्राप्त झाली आहे. जखमीला गंभीर भाजलेल्या अवस्थेत उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे. तो 60 ते 70 टक्के भाजला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
जखमी विलास मेथर यांचे साल्वादोर दु मुन्दू पंचायतीत दुकान आहे. दुपारी 1.15 वा. च्या सुमारास ते दुकान बंद करून घरी आपल्या जीए 03 आर 5727 या आलिशान कारने जात होते. ते तोर्ड पाटो रस्त्याने वाहन हाकताना पाटो रस्त्यावर त्यांचे वाहन एका अनोळखी व्यक्तीने अडविले. त्यांच्यामध्ये बोलणी चालू असतानाच संशयिताने मेथर यांच्या अंगावर पेट्रोल मिश्रीत द्रव्य ओतून आग लावली. मेथर वाहनाच्या आत असल्याने अचानक घडलेल्या प्रसंगाने या जीवघेण्या हल्ल्यातून ते वाहनाबाहेर येईपर्यंत अंगावरील कपडय़ांनी पेट घेतला. प्रसंगावधान राखून रस्त्याच्या बाजूला उडी घेऊ आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी लोकही जमा झाले होते. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तसेच 108 रुग्णवाहिकेलाही बोलावून जखमीला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले.
यासंदर्भात अधिक चौकशी केली असता, मेथर रहात असलेल्या सदनिकेतील जागेवरून वाद चालू होता. त्यासंदर्भात पंचायत कार्यालयात इमारत ठेकेदाराविरुद्ध बेकायदेशीर बांधकामावरून तक्रार दाखल करण्यात आली होती. पंचायत सचिवांनी 20 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली होती. त्या संदर्भात बुधवारी सचिवांची भेट घेऊन चर्चा केली होती. या घडामोडी नंतर दुपारी मेथर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामुळे पूर्वनियोजित कट असावा, अशी चर्चा लोकांत सुरू आहे.
दरम्यान या हल्ल्याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसन्नू, उपअधीक्षक एडवीन कुलासो, निरीक्षक निनांद देऊलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी फरारी संशयिताचा कसून शोध चालू केला आहे.
पंचायत क्षेत्रात झालेल्या या जीवघेण्या व अमानवी कृत्याचा सरपंच संदीप साळगावकर यांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून या प्रकरणाचा पोलिसांनी लवकरात लवकर छाडा लावून संशयितास गजाआड करावे व कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणी उपनिरीक्षक निखील पालयेकर यांनी निरीक्षक देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा केला.