प्रतिनिधी / जयसिंगपूर
जयसिंगपूर पोलीस ठाण्यात चोरी करून जिल्हा पोलीस प्रशासनालाच आव्हान दिलेल्या चोरटय़ाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. प्रेयसीचा पोलिसांच्या ताब्यात असणारा मोबाईल फोन मिळविण्यासाठी चोरटय़ाने पोलीस ठाण्यातील तब्बल 185 मोबाईल फोन चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार रघुनाथ बाळासो कदम (वय 28 रा. राजीव गांधीनगर जयसिंगपूर) व त्याचा मित्र मत्र पवन ऊर्फ विकास पाटील (वय 21 दोघे रा. राजीव गांधीनगर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, 8 जानेवारी रोजी मध्यरात्री जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या कारकून कक्षातील विविध कारवाईमधील 185 मोबाईल संचाची चोरीची घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेवर नामुष्कीची वेळ आली. पोलिसांसमोर तपासाचे मोटे आव्हान होते. जयसिंगपूर, इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली येथील पोलीस पथकास पाचारण करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कसून चौकशीही करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटजे ठरले महत्त्वाचा दुवा
शहर परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज घेऊन त्याद्वारे तपासणी करण्याची यंत्रणा गतिमान होती. जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या जवळ नांदणी सहकारी बँकेच्या बाहेरील सीसीटीव्हीत एक चोरटा कैद झाला होता. फुटेज हा एकमेव दुवा होता. मात्र, चेहरा अस्पष्ट असल्याने तपासात अडचणी होत्या. चोरट्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी कोम्बिग ऑपरेशन राबवले होते. अखेर संशयिताच्या चालीवरुन आणि त्याची कसून चौकशी केली असता पोलिसांना संशयीतापर्यंत पोहोचण्यास यश आले.
कदम हा संशयित आरोपी शहरातील श्रीमाता सोसायटीत 24 ऑगस्ट 2019 रोजी चोरीची घटनेतील आरोपी आहे. या प्रकरणात कदम याचे पोलिसांनी त्याचे दोन मोबाईल तपासासाठी घेतले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर 4 नोव्हेंबर 2019 रोजी एक मोबाईल परत दिला होता. या काळात कदम याने पोलिस ठाण्याची पाहणी केली होती.त्यानुसार त्याने ही चोरी केली असावी. एक मोबाईल पोलिसांच्या ताब्यात होता. तो मिळवण्यासाठी त्याने धाडस केले असावे असा पोलिसांचा प्रथमदर्शी अंदाज आहे. त्याने तशी कबुलीही दिली आहे. त्याच्यावर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 1 तर शिरोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2 गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलिस प्रमुख अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगीड्डे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, पेठवडगांवचे पोलिस निरीक्षक प्रदीप काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित घुले ,उपनिरीक्षक अजित पाटील, प्रमोद वाघ आदींनी घटनेचा तपास केला.
प्रेयसीचा हट्ट पुरविण्यासाठी थेट पोलिसांनाच आव्हान
रेकॉर्डवरील गुन्हेगार रघुनाथ बाळासो कदम हा श्रीमाता सोसायटीत 24 ऑगस्ट 2019 रोजी चोरीची घटनेतील संशयित आरोपी आहे. या गुह्यांमध्ये पोलिसांनी त्याचे दोन मोबाईल जप्त केले होते मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला एकच मोबाईल मिळालेला होता. दुसरा मोबाईल मिळवण्यासाठी त्याच्या प्रेयसीने हट्ट धरला. तिच्या हट्टासाठी त्याने थेट पोलीस ठाण्यांमध्ये चोरी करून पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिल्याचे तपासात समोर आले आहे.
मोबाईल फोन टाकले नदीपात्रात
पोलिसांपासून बचाव करण्यासाठी कदम याने मित्र पवन ऊर्फ विकास पाटील याच्या मदतीने अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीच्या पात्रात मोबाईल फोन टाकले होते. पोलिसांनी चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर शोध मोहीम राबवून 133 मोबाईल मिळवण्यात यश मिळवले आहे. दोघा संशयित आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना 23 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.