पाटणा पायरेट्स-तामिळ थलैवाज लढत बरोबरीत, पवन कुमार सेहरावत, अजिंक्य पवार यांचे चमकदार प्रदर्शन
वृत्तसंस्था/ बेंगळूर
स्टार रायडर पवन कुमारने नोंदवलेल्या 18 गुणांच्या बळावर बेंगळूर बुल्सने प्रो कबड्डी लीगमधील सामन्यात जयपूर पिंक पँथर्सचा 38-31 असा धुव्वा उडविला तर तामिळ थलैवाज व पाटणा पायरेट्स यांच्यातील अटीतटीचा सामना 30-30 असा टाय झाला.
पवन कुमार सेहरावतने 18 गुण मिळवित बेंगळूर बुल्सच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला, त्यात एका टॅकल गुणाचाही समावेश आहे. या विजयानंतर बेंगळूर बुल्सने पुन्हा एकदा अग्रस्थान मिळविले. जयपूर पिंक पँथर्ससाठी अर्जुन देशवालने सुपर 10 गुण मिळविले. त्यामुळेच त्यांना मोठा पराभव टाळून एक गुणही मिळविता आला. जयपूरचा कर्णधार दीपक हुडाकडून पुन्हा निष्प्रभ प्रदर्शन झाले तर बेंगळूरचा दुसरा रायडर चंद्रन रणजित याला फारसे काम करावे लागले नाही. जयपूरने संदीप धुळच्या जागी अनुभवी धर्मराज चेरालथनला खेळविले. त्यामुळे भक्कम बनलेल्या बचावफळीने पहिल्या मिनिटात पवन सेहरावतची दोनदा यशस्वी पकड केली. पवन कुमारची सुरुवात नेहमीप्रमाणे संथ झाली. पण सामना पुढे सरकेल तसे त्याला सूर गवसला. 12 व्या मिनिटाला बुल्सने जयपूरला पहिल्यांदा ऑलआऊट करीत 7 गुणांची आघाडी घेतली. दुसऱया बाजूने अर्जुन देशवालने 6 रेडपॉईंट मिळवित जयपूरचे आव्हान कायम राखले. मात्र पूर्वार्धात बुल्सने 20-14 अशी आघाडी घेतली. या सत्रात पवन सेहरावतचाच वरचष्मा राहिला.
पवनने सुपर टेन मिळवित जयपूरवर दडपण आणले. बुल्सला ऑलआऊट करण्याची संधी जयपूरला मिळाली होती. पण बुल्सचा बदली खेळाडू जीबी मोरेने 2 अप्रतिम टॅकल करीत आपल्या सर्वोत्तम खेळाडूंना मैदानात आणले. पवनच्या आक्रमणामुळे 11 व्या मिनिटाला बुल्सने दुसऱयांदा जयपूरला ऑलआऊट करीत 15 गुणांची भक्कम आघाडी मिळविली. देशवालने बुल्सच्या ढिलाईचा लाभ उठवित जयपूरसाठी आणखी एकदा सुपर टेन मिळविले. विजय निश्चित झाल्याने बुल्सकडून खराब टॅकलिंग झाले आणि जयपूरने त्यांना ऑलआऊट करण्याची संधी साधली.
तामिळ-पाटणा लढत टाय
त्याआधी झालेल्या पहिल्या सामन्यात तामिळ थलैवाज व पाटणा पायरेट्स यांनी 30-30 अशी बरोबरी साधली. दोन्ही संघ या सामन्याआधी अपराजित राहिले होते आणि या सामन्यातही ती मालिका अखंड राहिली. अतिशय चुरशीच्या झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. बेंचवरून आलेल्या अजिंक्य पवारने तामिळसाठी 12 गुण मिळविले तर मोनू गोयतने पायरेट्ससाठी 9 गुणांची कमाई केली.
तामिळचे प्रशिक्षक उदय कुमार यांनी लाईनअपमध्ये बदल करून मनजीत व के. प्रपंजन यांना बेंचवर बसवले. अजिंक्य पवार याआधीच्या सामन्यांतही तामिळच्या मदतीला धावला होता. त्यालाही स्टार्टिंग लाईनअपमध्ये ठेवण्यात आले नाही. पण कर्णधार सुरजीत सिंगने आपल्या संघाचे आव्हान यशस्वीपणे राखत वर्चस्व गाजविले. पूर्वार्धात दोन्ही संघांना टॅकल्सचे जास्त गुण मिळाले. पायरेट्ससाठी मोनू गोयतने तामिळच्या भक्कम बचावातही अवघड गुण मिळवून दिले. पायरेट्समध्ये बचाव व आक्रमण दोन्ही करू शकणारे अनेक खेळाडू असल्याने तामिळला गुण मिळविणे कठीण जात होते. पायरेट्सने पूर्वार्धातील शेवटच्या मिनिटाला तामिळला ऑलआऊट करीत 18-12 अशी आघाडी घेतली.
अजिंक्य पवारच्या आगमनानंतर तामिळच्या आक्रमणाला अधिक धार आली. त्याने या सत्राच्या प्रारंभीच दोन रेडपॉईंट मिळवित आपल्या संघाची गाडी रूळावर आणली आणि 8 व्या मिनिटाला पायरेट्सला त्यांनी ऑलआऊट केले. दहा मिनिटे बाकी असताना पवारने सुपर 10 मिळवित 2 गुणांची आघाडी मिळवून दिली. सामना संपण्यास एक मिनिट असताना दोघांची 30-30 अशी बरोबरी झाली होती. पण दोन्ही संघांनी सुरक्षित खेळावर भर देत विजय मिळविण्याचा प्रयत्न न करता टायच्या 3 गुणांवर समाधान मानणे पसंत केले.
आजचे सामने
1) यूपी योद्धा वि. दबंग दिल्ली
वेळ ः रात्री 7.30 वा.
2) यू मुम्बा वि. तेलुगू टायटन्स
वेळ ः रात्री 8.30 वा.
3) गुजरात जायंट्स वि. पाटणा पायरेट्स
वेळ ः रात्री 9.30 वा.