प्रतिनिधी /मडगाव
गोव्यातील कोमुनिदादच्या जागेत अनेकांनी बेकायदेशीर घरे बांधली आहेत. ही घरे कायदेशीर झालेली नाहीत. ही घरे कायदेशीर करण्यासाठी सरकारने भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक विधानसभेत संमत केल्यानंतर गोवाभर त्याला विरोध होऊ लागला आहे. आत्ता या विरोधात गोव्यातील कोमुनिदादी सहभागी होणार आहेत.
कोमुनिदादच्या मालकीच्या जागेत मुळात घरे बांधताच येत नाही. कारण, कोमुनिदादची जागा ही स्थानिक लोकांसाठी शेती लागवड किंवा अन्य पीके घेऊन स्वतःची उपजीविका चालविण्यासाठी आरक्षित केलेली आहे. मात्र, कोमुनिदादच्या जागेत अनेकांनी अतिक्रमण करून घरे बांधलेली आहेत. त्याचबरोबर काही जणांनी स्थानिक कोमुनिदादच्या ऍटर्नीना हाताशी धरून ही बेकायदा बांधकामे केली आहेत. त्यात बिगर गोमंतकीयांचा देखील समावेश आहे.
सरकारच्या नव्या विधेयकामुळे कोमुनिदादच्या जागेत असलेल्या घरांना कायदेशीर मान्यता मिळणार असल्याने, कोमुनिदादींना आपली हक्काची जागा गमावावी लागणार याची जाणीव झाल्याने, आता कोमुनिदादचे पदाधिकारी जागृत झाले असून त्यांनी या विधेयकाला विरोध करण्याची तयारी सुरू केली आहे. त्या सदंर्भातील अधिकृत माहिती आज मडगावात दिली जाणार आहे.
चिंचणी नागरिक मंचचा विरोध
दरम्यान, चिंचणी नागरिक मंचने देखील भूमिपुत्र अधिकारिणी विधेयकाला विरोध केला आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळय़ांसमोर ठेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी हे विधेयक आणले असल्याचा आरोपही मंचने जारी केलेल्या पत्रकातून केला आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे विधेयक आणून सरकार काय साध्य करू पहाते असा सवाल मंचने उपस्थित केलेला आहे. गेली कित्येक वर्षे नीज गोंयकार या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. त्यांना सहजासहजी कोणी हटवू शकत नाही. त्यामुळे असे विधेयक आणून सरकार काय साध्य करू पहाते, असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे.
19 डिसेंबर 1961 पूर्वी जन्म झालेले सर्वजण नीज गोंयकार आहेत आणि त्याची माहिती सर्वांना आहे. नीज गोंयकाराची ओळख नव्याने करून देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांची देखील गरज नसल्याचे मंचने म्हटले आहे.