महिला दुकानदारांचा 500 वर्षे जुना सर्वात मोठा बाजार
मणिपूरची राजधानी इंफाण्मध्ये एक ठिकाण आहे ‘इमा कॅथल’ म्हणजेच मदर्स मार्केट. हा बाजार 11 महिन्यांनी पुन्हा खुला झाला आहे. पूर्णपणे महिला दुकानदारांकडून संचालित होणारा हा बाजार असून याचा इतिहास 500 वर्षांपेक्षाही अधिक जुना आहे.
या अर्थाने (महिला दुकानदारांकडून संचालित) हा जगातील सर्वात मोठा बाजार आहे. येथे 3,600 पेक्षा अधिक महिला व्यावसायिकांची दुकाने आहेत. इमा कॅथलमध्ये तीन विविध परिसर आहेत. तेथे स्थानिक मणिपुरी उत्पादने, कपडय़ांसह जवळपास सर्व वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतात. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या समाजात हा बाजार महिला सशक्तीकरणाचे मोठे प्रतीक आहे. तसेच ब्रिटिश काळापासूनच हा बाजार विविध सामाजिक मुद्दे आणि अवैध कारवायांच्या विरोधातील मोहिमेचे मुख्य केंद्रही राहिला आहे.
इमा मार्केटमध्ये पुरुषांच्या येण्यावर बंदी नाही, ते खरेदी करू शकतात, पण व्यावसायिक म्हणून तळ ठोकू शकत नाहीत. पारंपरिक पोशाखा परिधान केलेल्या मणिपुरी महिलाच दुकाने तसेच स्टॉल्सचे संचालन करतात. पारंपरिक सण आणि कार्यक्रमांचे आयोजनही तेथे केले जाते.
महिला विक्रेत्या परस्परांच्या गरजा पूर्ण करण्यासह नव्या विक्रेत्यांना मार्गदर्शनही करतात. मागील वर्षी देशात टाळेबंदी लागू केल्यावर 21 मार्चपासून हा बाजार बंद होता. सर्वेक्षणानुसार बाजार बंद राहिल्याने तेथील व्यावसायिक महिलांना सुमारे 3,879 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महिला विक्रेत्यांना परवाना शुल्कात सूट दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री विरेन सिंग यांनी केली आहे. तसेच सरकारने 100 हून अधिक विक्रेत्यांसाठी कर्जाची व्यवस्थाही केली आहे.