कोवाड / वार्ताहर
निट्टूर (ता. चंदगड) येथे एक पुरुष आणि पाच महिला, मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. जखमींना कोवाड येथील प्राथमिक रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
निट्टूर येथील जवळपास पंधरा स्त्री, पुरुष मलतवाडी जवळ असलेल्या अंबु शेतात मळणी काढण्यासाठी गेले होते. सदर शेतकरी केवळ शेतात जाऊन पोहचले होते. इतक्यात शेतातील माकडांनी झाडावर असलेल्या कोणग्या जातीच्या मधमाशांना नाहक त्रास दिला. परिणामी संतापलेल्या मधमाशांनी मळणीसाठी गेलेल्या त्या शेतकर्यांवर आकस्मिक तीव्र हल्ला चढविला. त्यांनी जीव वाचविण्यासाठी रस्ता मिळेल तिकडे धावाधाव सुरू केली. काहीजण उसाच्या मळ्यात लपून बसले. सुदैवाने ते थोडेफार सुरक्षित राहिले. मात्र मधमाशांनी महिलांवर मोठ्या प्रमाणावर हल्ला चढवला.
जखमी सुप्रिया नामदेव पाटील वय (42), नम्रता कल्लाप्पा पाटील वय (31), अनुसया नरसु पाटील वय (६५), यांच्यावर कोवाड येथील प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर विलास भैरू पाटील वय (40), शालन भैरू पाटील वय (42), रेणुका शिवाजी पाटील वय (31) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.