शंभरला आठ ते दहा बांगडे
पापलेटची आवक सुरू
मोठय़ा सुरमईसाठी प्रतीक्षाच
मालवण:
मत्स्य हंगामाच्या सुरुवातीला बारदानी वाऱयांनी जोर धरल्यामुळे थंडावलेली मासेमारी आता हळूहळू जोर पकडतेय, असे चित्र शनिवारी मालवणात पाहायला मिळाले. मालवण बंदरात ट्रॉलर्स आपली जागा घेऊ लागले असून शनिवारी सकाळी बाजारात पारंपरिक मच्छीमारांकडून बांगडा मासा बऱयापैकी उपलब्ध झाला होता. त्यामुळे मत्स्य खवय्यांना शंभर रुपयांना आठ ते दहा बांगडे खरेदी करता आले. कोळंबी, पापलेट, छोटी सुरमई, मोरी यासारख्या चविष्ट माशांच्या लिलावांनीही मासळी मार्केटच्या ठिकाणी रंगत आणली होती.
गेले दहा दिवस बारदानी वाऱयांचा जोर राहिल्यामुळे यामाहा फायबर नौका मासेमारीला जाण्याचे प्रमाण खूप कमी होते. शिवाय ट्रॉलरदेखील मासेमारीस उतरले नव्हते. शनिवारी आठ ते दहा ट्रॉलर्स मासेमारीसाठी सज्ज झाल्याचे दिसून आले आणि त्यांनी प्रत्यक्ष मासेमारीसही प्रारंभ केला. पारंपरिक मच्छीमारांनीदेखील आऊटबोट इंजिनच्या साहय़ाने गिलनेट मासेमारी जोमाने सुरू केल्याचे चित्र होते. पारंपरिक मच्छीमारांकडून आलेल्या बांगडय़ाला सुरुवातीस टोपलीमागे 600 रुपये दर होता. जसजशी बांगडय़ाची आवक वाढत गेली तसतसा हा दर टोपलीमागे 500 रुपयांवर स्थिरावला. पापलेटला लहान-मोठय़ा आकारानुसार दर मिळत होता. बारीक पापलेटला टोपलीमागे 2100 ते 2500 इतका तर मोठय़ा पापलेटला टोपलीमागे तीन ते साडेतीन हजारच्या आसपास दर मिळाला. छोटी सुनाकी अर्थात सनाकी प्रती टोपली 1200 रुपयांना खरेदी केली गेली. मोरीचा दर प्रतिकिलो 280 ते 290 होता. पांढऱया कोळंबीचा भाव प्रती किलो 300 रुपये होता.
दरम्यान, रविवारी आपल्या काही न्याय मागण्यांसाठी पारंपरिक मच्छीमारांच्या
प्रतिनिधींकडून उपोषण आंदोलन केले जाणार आहे. मात्र, सध्या हंगामाची सुरुवात असल्याने मासेमारी सुरू ठेवूनच यावेळेस आंदोलने केली जाणार असल्याचे समजते. त्यामुळे रविवारी नेहमीप्रमाणे मासेमारी सुरू राहणार आहे.