प्रतिनिधी / बार्शी
यंदाची दिवाळी साजरी करताना बार्शीतील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी , कोणताही अनुचित प्रकार घडू नये , दिवाळीच्या उत्साहाला कुठेही विरझण लागू नये यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी करत बार्शी तालुक्यातील तमाम नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत सामाजिक सलोखा निर्माण करत दिवाळी साजरी करण्याची विनंती बार्शी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी केली आहे.
यावेळी बार्शी पोलिसांनी बार्शीतील तमाम नागरिकांना आवाहन केले की दिवाळी साजरी करत असताना सुरक्षित साजरी करावी. यावेळी बार्शी पोलिसांनी केलेल्या सूचनांनुसार नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी किंवा बाहेरगावी जाताना घरात पैसे, दागिने ठेऊन नये तसेच दिपावलीसाठी बाहेरगावी जायचे असल्यास घरात असलेले पैसे बँकेत ठेवावेत असे आवाहन केले आहे.
जर नागरिक बाहेरगावी जाणार असल्यास आपल्या शेजाऱ्यांना आपण बाहेरगावी जात असल्याची माहिती द्यावी. बाहेरगावी जातांना महिलांनी प्रवासात दागिने घालून जावू नये. प्रवासात कोणीही दिलेले खाद्य पदार्थ किंवा पेय खाऊ नयेत. त्यामध्ये गुंगीचे औषध असू शकते. प्रवासात अनोळखी महिला, पुरुषांपासून सावध रहावे.
गर्दीच्या ठिकाणी व बसमध्ये चढताना, उतरताना आपले पॉकेट, पर्स, बॅगकडे लक्ष ठेवावे. व्यापारी, दुकानदार, सराफा यांनीही या काळात मोठया प्रमाणात माल खरेदी केलेला असतो. त्यामुळे रात्रीचे वेळी सुरक्षा ठेवावी, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. अश्या प्रकारे बार्शी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले असून बार्शी शहर पोलीस स्टेशन नागरिकांच्या प्रत्येक अडचणी आणि समस्या सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे यावेळी सांगितले. तसेच कोरोनाविषाणू चा कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी बाजारात खरेदी करताना किंवा इतरत्र फिरताना तोंडाला मास्क घालावा आपले हात वारंवार निर्जंतूक करावे असेही आवाहन यावेळी केले.