ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशात लखनऊ, मेरठ, गोरखपूर सह सर्व जिल्हे आजपासून अनलॉक झाले आहेत. आता प्रदेशात केवळ रात्री 7 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू जारी असेल. या सर्व जिल्ह्यांमध्ये सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 600 पेक्षा कमी आहे. मागील 24 तासात प्रदेशात 797 नवीन रुग्ण आढळून आले. तर कालच्या दिवशी 2.85 लाख नमुन्यांची तपासणी करण्यात आली. सद्य स्थितीत प्रदेशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 1 आहे. तर संसर्गाचे प्रमाण 0.2 टक्के इतके आहे.
मंगळवारी मिळालेल्या माहितीनुसार, प्रदेशात सक्रिय रुग्णांची संख्या 14,000 इतकी आहे. यातील 9,286 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. मुख्यमंत्री योगी यांनी सांगितले की, प्रदेशातील कोरोना व्हायरस कमी होत आहे. मात्र, अजून पूर्णपणे गेलेला नाही. त्यामूळे सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सर्वांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, तसेच बाहेर पडताना मास्क लावून बाहेर पडावे.
जूनमध्ये 1 कोटी लसीकरणाचे लक्ष्य
योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, प्रदेशातील लोकसंख्या लक्षात घेता लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यावर आम्ही भर देत आहोत. जून महिन्यात एक कोटी नागरिकांना लस देण्याचे आमचे लक्ष्य आहे. तर जुलै महिन्यापर्यंत ही मोहीम आणखी मोठ्या प्रमाणात वाढवली जाणार आहे. त्यासाठी आणखी एक लाख वॅक्सीनेटर तयार केले जात आहेत. या अंतर्गत नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. तर आतापर्यंत 2 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये 1,66,27,059 नागरिकांनी पहिला डोस तर 36,27,433 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 या वयोगटातील 30 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
काय असणार सुरू ?
- सर्व बाजार सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू असतील. तर आठवड्यातील दर शनिवारी आणि रविवारी बाजार बंद असतील.
- कोरोना लढ्यामधील आघाडीच्या सरकारी विभागांमध्ये पूर्णपणे उपस्थिती असेल. तर अन्य कार्यालयात 50% क्षमतेने उपस्थिती असेल.
- प्रत्येक खाजगी कार्यालयात कोविड हेल्प डेस्क बनवला जाईल.
- रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक असेल. यासोबतच प्रत्येकाची स्क्रिनिंग आणि एंटिजेन टेस्ट केली जाईल. तसेच कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास संबंधितांना रुग्णालयात दाखल केले जाईल.
- एक्स्प्रेस आणि हायवे वरील ढाबे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- कन्टोनमेंट झोन व्यतिरिक्त अन्य भागातील धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, एकावेळी केवळ पाच जणांनाच आत जाण्यास परवानगी असेल.
- तर कॉलेज, शाळा, शिक्षण संस्था अजूनही बंदच असतील. हॉटेल्स बंद असतील मात्र, पार्सल सेवा सुरू असेल.
- कोचिंग क्लास, थिएटर, जिम, स्विमिंग पूल, सलून, शॉपिंग मॉल बंदच असतील.