प्रतिनिधी /पणजी
राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी गोव्यात होणार असलेल्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला शुभेच्छा दिल्या असून शुभसंदेश पाठवला आहे. हा महोत्सव यशस्वी होईल, अशी खात्री त्यांनी संदेशातून वर्तवली आहे.
आयोजक आणि सहभागी होणारे कलाकार व इतर सर्वजणांचे राष्ट्रपतींनी स्वागत केले असून सदर महोत्सव आंतरराष्ट्रीय संबंध वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे अनेक कल्पना व इतर गोष्टी यांची देवाण घेवाण होते. चित्रपट निर्माते व त्या उद्योगातील सर्वांसाठी महोत्सव हे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व्यासपीठ झाले असून त्याचा लाभ फायदा गोव्यासह देशाला होत आहे. हा महोत्सव प्रतिनिधी व कलाकार आणि सहभागी होणाऱया इतर सर्वांसाठी विशेष अनुभवांची मेजवानी ठरणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
सिनेमांचे मुल्य, त्यांची विविध प्रकारची भाषा, माध्यमे, त्यामुळे होणारे मनोरंजन, करमणूक तसेच प्रबोधन सर्वांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. चित्रपट उद्योगात आता विविध प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान, साधन-सुविधा यांची भर पडली असून हे क्षेत्र आता अत्याधुनिक बनल्याचे मुर्मू यांनी म्हटले आहे. देशाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर या महोत्सवाचे मोठे योगदान असून त्यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय दर्जाची कलाकार मंडळी देशात येतात. त्यामुळे देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाते. आशियातील हा जुना महोत्सव असल्याचे त्यांनी संदेशातून नमूद केले आहे.