कर्नाटक सरकारने विकृत प्रवृत्तींना तात्काळ अटक कराः
प्रतिनिधी/ सातारा
जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिवतीर्थावर परिसर दणाणून सोडत कर्नाटकमधील घटनेचा तीव्र निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास दुग्धाभिषेक करण्यात आला. दरम्यान, कर्नाटक सरकारने तात्काळ विकृत्त मनोवृत्तीच्या लोकांवर कारवाई करावी, अशा शब्दात दीपक पवार यांनी कर्नाटक सरकारला ठणकावले.
बंगलोर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ रविवारी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास दुधाचा अभिषेक घालण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, सरचिटणीस राजकुमार पाटील, विद्यार्थी प्रदेश निरीक्षक अतुल शिंदे, सातारा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष शशिकांत वायकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा संमिद्रा जाधव, कुसूमाताई भोसले, युवती प्रदेश सचिव स्मिता देशमुख, युवती जिल्हाध्यक्षा पुजा काळे, प्रथमेश पवार, शुभम साळुंखे, प्रज्वल धुमाळ, वरद फडतरे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष अनिल बडेकर, डॉ. सुनीता शिंदे, रवीना वायकर, अशोक साळुंखे, बाबा सय्यद, दीपक चाळके आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना दीपक पवार म्हणाले, आम्ही या गोष्टीचा सातारा जिल्हावासियांच्यावतीने निषेध व्यक्त करत आहोत. कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करत आहोत. कर्नाटक सरकारने ज्या कोणी हा प्रकार केला आहे. त्याचा शोध घेवून तात्काळ त्यावर कारवाई करावी. छत्रपती शिवाजी महाराज हे अख्या भारताचे दैवत आहेत. मराठय़ाचे दैवत आहे. आमच्या दैवताची विटंबना झाली तर आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा कर्नाटक सरकारला दिला आहे.