प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत. शिवाय कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना रुग्णवाहिका व शववाहिका मिळत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. याची गंभीर दखल घेऊन तात्काळ 108 रुग्णवाहिका व शववाहिका उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांच्याकडे केली आहे.
खेडय़ापाडय़ात कोरोना रुग्ण मिळत असून रुग्णाला कोविड सेंटरमध्ये वेळेत दाखल करण्यासाठी 108 रुग्णवाहिका सेवेची आवश्यकता असते. परंतु जिल्हय़ात 108 सेवा फारच कमी उपलब्ध असल्याने रुग्णांच्या परिवाराला सहा ते आठ तास वाट पाहावी लागते. दुपारी येणारी रुग्णवाहिका रात्री पोहोचते. त्यामुळे गरजू रुग्णांची व त्यांच्या कुटुंबियांची तारांबळ उडते. त्यामुळे स्थानिक प्रशासन व आरोग्य कर्मचारी यांना वेळोवेळी जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. 108 सेवा शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे उपलब्ध करून मिळावी, यासाठी शिरोडा ग्रामपंचायत व पंचक्रोशीतून मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालय येथे शववाहिका उपलब्ध होत नसल्याने मृताच्या नातेवाईकांना खासगी रुग्णवाहिका भाडय़ाने आणावी लागते. ज्याचे शिरोडा-रेडीपर्यंतचे भाडे हे साडेसात हजार ते आठ हजार एवढे असते. मृत व्यक्तीच्या सोबत असणाऱया व्यक्तींना चार ते पाच पी. पी. ई. किट लागतात, जी विकत घ्यायची म्हटल्यास त्यांची किंमत पाच ते सहा हजार रुपये एवढी होते. कोरोना आपत्कालीन परिस्थितीमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. ती एवढे पैसे कोठून आणणार, याचा साधा विचारही शासन करताना दिसत नाही, याकडे राऊळ यांनी लक्ष वेधले.