चोरीचे मंगळसूत्र सोसायटीत गहाण ठेवल्याचे उघड
प्रतिनिधी / बेळगाव
सोलापूरहून बागलकोटला जाण्यासाठी रेल्वेत प्रवास करणाऱया महिलेची व्हॅनेटी बॅग पळविल्याच्या आरोपावरुन विजापूर रेल्वे पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. व्हॅनेटी बॅगमधील मंगळसूत्र चोरुन या चोरटय़ाने बबलेश्वर येथील एका सोसायटीत गहाण ठेवल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
रेल्वेच्या पोलीस उपअधिक्षक पुष्पलता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमीर्ची, के. शिवमूर्ती, चंद्रशेखरय्या, आनंद एच. आर., शिवाप्पा हेगडे, मुत्ताप्पा सागर मालापूर आदींनी ही कारवाई केली आहे. चोरटय़ाने सोसायटीत गहाण ठेवलेले 40 ग्रॅमचे दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
माळाप्पा उर्फ मनोज मलकाप्पा मादर (वय 25, रा. हच्चाळ, ता. शिंदगी, जि. विजापूर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. 20 सप्टेंबर 2019 रोजी मध्यरात्री चोरीची ही घटना घडली होती. यासंबंधी शोभा आनंद परंडी (वय 27) या महिलेने विजापूर रेल्वे पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
सोसायटीतून दागिने जप्त
रेल्वेत प्रवास करताना शोभा हीला झोप लागली. त्यावेळी 40 ग्रॅम सोन्याचे दागिने, 15 हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल संच व 2 हजार रुपये रोख रक्कम असलेली एक व्हॅनेटी बॅग चोरण्यात आली होती. माळाप्पा उर्फ मनोजला रेल्वे पोलिसांनी मंडय़ा येथे अटक केली आहे. बबलेश्वर येथील श्री बिरेश्वर को-ऑप सोसायटीत त्याने आपल्या एका नातेवाईकाच्या नावे दागिने गहाण ठेवून 1 लाख 6 हजार रुपये काढले होते. पोलिसांनी हे दागिने जप्त केले आहेत.