प्रतिनिधी / बेळगाव
रेल्वे स्टेशन समोरील कारवार बसस्थानकाचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. सदर कामाचा शुभारंभ करून महिना उलटला पण हे काम संथगतीने सुरू आहे. आतापर्यंत येथील जीर्ण इमारती हटवून नव्या इमारतीच्या उभारणीसाठी पाया खोदाई करण्यात आली आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याच्यादृष्टीने गतिमान होणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
रेल्वे स्टेशनसमोरील बसस्थानकाचा परिसर कॅन्टोन्मेंट हद्दीत येतो. सदर बसस्थानकाचा विकास करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली आहे. बसस्थानकाच्या बांधकामासाठी संरक्षण खात्याकडून परवानगी घेणे बंधनकारक होते. त्यामुळे सदर प्रस्ताव राबविण्यास विलंब झाला आहे. पाठपुरावा केल्यानंतर बसस्थानकाच्या विकासासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सदर कामाचा शुभारंभ मागील महिन्यात करण्यात आला आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी सूचना आमदार अनिल बेनके यांनी कंत्राटदाराला केली होती. या बसस्थानकावर शहराच्या दक्षिण भागातील बसेस तसेच कारवार, रामनगर, जोयडा, पणजी, जांबोटी, वास्को अशा लांब पल्ल्याच्या बस थांबतात. या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बसस्थानकाचा विकास तातडीने करणे आवश्यक आहे. या ठिकाणी हॉटेल, व्यापारी गाळे, बसथांबे, विश्रांतीगृह अशा विविध सुविधा असलेली इमारत उभारण्यात येणार आहे. सदर कामासाठी 9 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. पण सदर काम लवकर पूर्ण करून बसथांबा खुला करण्याची गरज आहे. मात्र हे काम संथगतीने सुरू असून, आतापर्यंत जुन्या इमारती हटवून नव्या इमारतीसाठी पाया खोदाईचे काम करण्यात आले आहे.
बसस्थानकाचे काम करण्यात येत असल्याने या ठिकाणी बस थांबविण्याचे बंद केले आहे. या ठिकाणी येणाऱया बस रेल्वे स्थानकासमोर थांबविण्यात येत आहेत. पण गर्दी होत असल्याने जास्त वेळ न थांबविता बस जात आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. या ठिकाणी काम सुरू असल्याने नागरिकांना याची माहिती नाही. तसेच बस कुठे थांबतात याची माहिती मिळणे मुश्कील बनले आहे. काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरता थांबा म्हणून नागरिकांना माहिती होण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे बसस्थानकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.