मांगोरहिल रुग्णांची संख्या 100 वर : राज्यातील रुग्णांचा आकडा 140 : शुक्रवारी दिवसभरात 30 नवे रुग्ण
प्रतिनिधी पणजी/वास्को
कोरोनाचा फैलाव आता गावागावात पोहचू लागला असून मांगोरहिल हे या फैलावाचे मुख्य केंद्र बनले आहे. सत्तरी, फोंडा, सांगे तालुक्यांमध्येही शुक्रवारी कोरोना पोहोचल्याचे स्पष्ट झाले असून हे सर्वजण वास्कोत नोकरीला आहेत. काल चौथ्या दिवशी तपासणीत आणखी 26 जण बाधित झाल्याचे आढळून आल्याने मांगोरहिल परिसरातील कोरोनाबांधितांची संख्या 100 हून अधिक झाली आहे. दुबईहून विमानाने आलेल्या प्रवाशांपैकी 4 जण बाधित आहेत. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा आता 140 पर्यंत पोहचला आहे. तथापि संपूर्ण वास्को शहर सीलबंद करण्यास मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा नकार दर्शविला आहे. मांगोरहिल कोविड रुग्णांची तपासणी करणाऱया तेथील इस्पितळाच्या अनेक कर्मचाऱयांनाही कोविडची लागण झाल्याने ते बंद ठेवावे लागले आहे.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी वास्को शहर लॉकडाऊन करण्याची गरज नाही, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी केला. वास्कोत आरोग्य खात्यात जे कर्मचारी आहेत, त्यापैकी अनेकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्याने राज्यभरात खळबळ माजली आहे. त्यापैकी सत्तरीत गुळेली व मोर्ले येथे मिळून दोन, सांगेत मुगोळी येथे एक, फोंडय़ात आडपई येथे एक, बार्देशमध्ये साल्वादोर दु मुंदू येथे एक दिल्लीहून आलेली महिला रुग्ण सापडली आहे.
वास्को लॉकडाऊनची गरज नाहीच : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सायंकाळी घेतलेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत सांगितले की शुक्रवारी 26 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून राज्यातील एकूण उपचार घेणाऱया रुग्णांची संख्या 130 झाली आहे. त्यातील 96 जण हे मांगोरहिल भागातील असून उर्वरित इतर ठिकाणचे आहेत. कोरोनाचे संक्रमण मर्यादित व स्थानिक पातळीवर असल्यामुळे संपूर्ण वास्को शहर लॉकडाऊन करण्याची गरज नाहीच, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. सोमवार 8 जून पासून रेस्टॉरंट व प्रार्थनास्थळे सुरू करण्यात येणार असून तेथे मर्यादित स्वरुपात प्रवेश मिळेल, गर्दी करून चालणार नाही, असेही ते म्हणाले.
गोव्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असून त्याचा प्रसार सामुदायिक नाही. मांगोरहिलमधील सर्वांची कोरोना तपासणी करण्यात येणार असून पूर्ण वास्को लॉकडाऊन करणे हा उपाय सध्या तरी योग्य नाही. गरज पडली तर त्याचा विचार नंतर करण्यात येईल, असे आवाहन त्यांनी केले.
सीमेवरील कर्मचाऱयांकडून चूक होऊ शकते
कळंगूट येथे मिळालेली कोरोना पॉझिटिव्ह महिला गोव्यात कशी पोचली? तिची तपासणी येतेवेळी का झाली नाही? याची चौकशी सुरू असून सीमेवरील कर्मचारी वर्गाकडून चूक होऊ शकते असे निवेदन डॉ. सावंत यांनी केले. गोव्यात अनेकजण मूळ गोमंतकीय म्हणून घरी येतात त्यांना अडवू शकत नाही. त्या सर्वांची कोरोना तपासणी मात्र केली जाते. पॉझिटिव्ह अहवाल आला तर मडगाव येथील कोविड हॉस्पिटलात भरती करून कोणतेही पैसे घेतले जात नाही. तेथे काम करणारे डॉक्टर्स, नर्स व इतर यांची व्यवस्था स्वतंत्र खोलीत करण्यात आली असून त्यांचीही कोरोना तपासणी होते. शिवाय त्या सर्वांना सुरक्षित कवच देण्यात आले असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला.
आमदारांनाही कर्जाचे व्याज बँकदराने
सरकारी खर्चास कात्री लावण्यात आली असून आमदारांना देखील कर्जाचे व्याज आता बँकेच्या दरानुसार भरावे लागणार आहे. गेल्या 2016 पासून प्रलंबित असलेले विविध उद्योग वादग्रस्त कर (व्हॅट व इतर) निकालात काढण्यासाठी आणि ते वसूल होण्यासाठी विशेष योजना आखण्यात आली असून त्याची संधी घेऊन त्यांनी कर भरणा करावा असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले आहे. व्यावसायिक कर आयुक्तांनी त्या योजनेची अधिसूचना जारी केल्याची माहिती त्यांनी दिली. खर्च कमी करणारे विविध उपाय येत्या बुधवारपर्यंत लागू होतील, असेही डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.