राजकारणात प्रवेशाची चाहुल – चर्चेत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश
वृत्तसंस्था/ चंदीगड
कोरोना काळात लोकांना मदत करून चर्चेत आलेला बॉलिवूड स्टार सोनू सूद राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता वाढल्याने पंजाब काँग्रेसची धाकधूक वाढली आहे. याचमुळे काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरीश चौधरी आणि मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी चंदीगडमध्ये त्याची भेट घेतली आहे.
सोनू स्वतः निवडणूक लढवू इच्छितो का कुटुंबातील सदस्यासाठी तिकीट इच्छितो हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते. सोनू सूद हा मोगाचा रहिवासी असून त्याची बहिण राजकारणात खूपच सक्रीय आहे.
सोनू सूद कोरोना काळापासून अत्यंत लोकप्रिय आहे. पंजाब सरकार त्याला ब्रँड ऍम्बेसिडर करू इच्छिते, जेणेकरून वीज, पेट्रोल-डिझेलशी संबंधित निर्णयांचा प्रचार होऊ शकेल अशीही चर्चा आहे. सोनू यापूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंह हे मुख्यमंत्री असताना कोरोनासंबंधी जागरुकतेसाठी ब्रँड ऍम्बेसिडर राहिला होता.
नेत्यांनी घोषणापत्रासंबंधी जनतेशी करार करावा. तसेच जिंकल्यावर शपथ घेतेवेळी राजीनामाही सोबत ठेवावा, निश्चित कालावधीत आश्वासनांची पूर्तता न झाल्यास त्यांनी राजीनामा द्यावा असे सोनूने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ प्रसारित करत म्हटले होते.
सोनू सूदने यापूर्वी आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. याचमुळे तो पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतो असा कयासही वर्तविला जातोय.