प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर येथील मार्केट यार्डातील व्यापाऱ्याची जुना पुना नाका परिसरात मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पाच लाख रुपये असलेली बॅग पळविली. एकाने बंदुकीचा धाक दाखविला तर दुसऱ्याने कारची काच फोडून रोकड असलेली बॅग लंपास केल्याची समजते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास यार्डातील व्यापारी हे त्यांचे दुकान बंद करून घराकडे निघाले होते. दिवसभर व्यापार करून जमा झालेली रोकड त्यांनी स्वतः जवळील बॅग ठेवली होती. रोकड असलेली बॅग ते कारमध्ये ठेवून घराकडे निघाले होते. जुना पुना नाका परिसरातील समर्थ हॉटेलच्या अलीकडे त्यांनी त्यांची कार रस्त्यावर उभा केली. ते लघुशंकेला करिता कारमधून खाली उतरले. दरम्यान तेथे एक अनोळखी इसम आला त्याने व्यापाऱ्याला तू मला धक्का दिला या कारणावरून दमदाटी करीत रस्त्याच्या बाजूला नेले. तेथे त्याने व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवल्याची चर्चा परिसरात होती. त्याच वेळेस दुसरा इसम तेथे आला त्याने कारची काच फोडून आत रोकड असलेली बॅग घेऊन पोबारा केला.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली असून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.