वार्ताहर/ हिंडलगा
हिंडलगा येथील पंपिंग स्टेशनमधुन शिवाराकडे जाणारा रस्ता अचानक बंद करण्यात येत असल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. शिवाय रस्ता बंद झाल्यास शेतकरी बांधवांना वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण होणार असल्याने पाणी पुरवठा मंडळाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत शेतकरी बांधवांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिंडलगा येथे मार्कंडेय नदीकिनारी उभारण्यात आलेल्या पंपिंग स्टेशनसाठी पाच एकर जमीन संपादीत करण्यात आली होती. तसेच पाणी पुरवठा करण्यासाठी शिवारातून जलवाहिनी घालण्यात आली आहे. यासाठी देखील गावातील शेतकऱयांची जमीन गेली आहे. पंपिंग स्टेशन सुरु केल्यापासून आतापर्यंत शिवाराकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला होता. पण गेल्या काही दिवसांपासून पंपिंग स्टेशनमधुन शिवाराकडे गेलेला हा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न पाणी पुरवठा मंडळाने चालविला आहे. यासाठी पंपिंग स्टेशनसमोर गेट उभारल्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तर मागील बाजुला देखील गेट बंद करून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱयांना कंपाऊंड तुटलेल्या ठिकाणाहून केवळ दुचाकी घेऊन शिवाराकडे जात येत आहे.तर बैलगाडी ट्रक्टर व इतर वाहने नेण्यासाठी रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे शेतकऱयांसमोर मोठी समस्या निर्माण झाली असून नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांशी चर्चा करून रस्ता बंद करण्यास विरोध दर्शविण्यात आला. तरी देखील अधिकाऱयांनी शेतकरी व ग्रामस्थांचा विरोध झुगारून रस्ता बंद करण्याचा खाटाटोप सुरुच ठेवला आहे. त्यामुळे वरिष्ट अधिकाऱयांनी याकडे त्वरित लक्ष देऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला न केल्यास पाणी पुरवठा मंडळाच्या मनमानी कारभाराविरोधात रस्ता रोको आंदोलन छोडण्याचा इशारा शेतकरी बांधव व ग्रामस्थांनी दिला आहे.