10 रोहिंग्यांचा आरोपींमध्ये समावेश
वृत्तसंस्था/ अगरतळा
त्रिपुरामध्ये अवैध स्वरुपात भारतात प्रवेश करणाऱया अगरतळा रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस दलाने (आरपीएफ) 12 विदेशी नागरिकांसह 16 जणांना ताब्यात घेतले आहे. यासंबंधी पोलीस अधिकाऱयांनी रविवारी माहिती दिली आहे. एका इनपूटच्या आधारावर आरपीएफने स्थानकावरून 3 मुलांसमवेत एकूण 16 जणांना ताब्यात घेतले आहे, यात 12 विदेशी नागरिक (2 बांगलादेशी, 10 रोहिंग्या) सामील असल्याचे रेल्वे पोलीस अधिकारी राणा चटर्जी यांनी सांगितले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये मधुपूर येथील अभिजीत देव नावाचा एक हस्तक देखील सामील आहे. त्यानेच या विदेशी नागरिकांना अवैध मार्गाने भारतात आणले होते. अगरतळा रेल्वेस्थानकावरून हे सर्वजण कंचनजंघा एक्स्प्रेसद्वारे कोलकाता येथे जाणार होते. आरोपींना न्यायालयासमारे हजर करण्यापूर्वी त्यांचे वैद्यकीय परीक्षण करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींची चौकशी करत त्यांच्या अवैध घुसखोरीच्या मार्गाचा थांगपत्ता लावला जाणार आहे.