नन अभया हत्याप्रकरणी सीबीआय न्यायालयाचा निर्णय
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळच्या बहुचर्चित सिस्टर अभया हत्याप्रकरणी सीबीआयने मंगळवारी निर्णय राखून ठेवला आहे. तिरुअनंतपुरम येथील सीबीआय न्यायालयाने 21 वर्षीय सिस्टर अभया यांच्या हत्येप्रकरणी कॅथोलिक पाद्री आणि एका ननला दोषी ठरविले आहे. याप्रकरणी बुधवारी शिक्षा सुनावली जाणार आहे.
सिस्टर अभया यांचा मृतदेह 1992 मध्ये कोट्टायमच्या एका कॉन्वेंटमधील विहिरीत आढळला होता. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश जे. सनल कुमार यांनी याप्रकरणी निर्णय दिला आहे. शिक्षेच्या कालावधीसंबंधीचा निर्णय बुधवारी जाहीर केला जाणार आहे. फादर थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी यांच्या विरोधातील हत्येचा आरोप सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दोन्ही गुन्हेगार सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणी अन्य आरोपी फादर फूथराकयाल यांना पुराव्यांच्या अभावी निर्दोष ठरविण्यात आले आहे.
सिस्टर अभया यांचा मृतदेह सेंट पियूस कॉन्वेंटच्या विहिरीत आढळल्याच्या 28 वर्षांनी न्यायालयाचा निर्णय आला आहे. हत्येपूर्वी अभया कॉन्वेंटमध्येच वास्तव्यास होत्या. अभया यांचे आईवडिल काही वर्षांपूर्वीच निर्वतले आहेत. स्वतःच्या मुलीला न्याय मिळवून देण्याच्या प्रतीक्षेतच त्यांचे निधन झाले आहे. स्थानिक पोलीस आणि त्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेने याप्रकरणी तपास करत हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे म्हटले होते. तर सीबीआयने 2008 साली या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. मागील वर्षी 26 ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या सुनावणीदरम्यान अनेक साक्षीदार उलटले होते. अभयावर कुऱहाडीने हल्ला करण्यात आला होता. तिन्ही आरोपी सामील असलेल्या अनैतिक कृत्यांची ती साक्षीदार होती.