एसबीआयसह विविध संस्थांच्या अहवालामधून माहिती समोर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
2019-20 ते 2022-23 या आर्थिक वर्षात देशातील संघटित क्षेत्रात सुमारे 5.2 कोटी नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, एनपीएस आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळ यांच्या डेटाच्या विश्लेषणावर आधारित एसबीआय रिसर्चने मंगळवारी जारी केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. सरकार एप्रिल 2018 पासून संघटित क्षेत्रात निर्माण झालेल्या रोजगाराची आकडेवारी जाहीर करत आहे. इपीएफओ, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि इएसआयसी डेटाच्या आधारे रोजगाराची माहिती जारी केली जात आहे.
इपीएफओच्या संघटित क्षेत्रात निर्माण झालेल्या रोजगारावरील मागील चार वर्षांच्या आकडेवारीनुसार, 2019-20 ते 2022-23 या आर्थिक वर्षात 4.86 कोटी भागधारक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत सामील झाले. त्यात नवीन नोकऱ्या तसेच एका ठिकाणचा राजीनामा देऊन दुसरी नोकरी मिळवणाऱ्यांचाही समावेश आहे. आकडेवारीनुसार, ज्यांना दुसरी नोकरी मिळाली किंवा पुन्हा ईपीएफओचे भागधारक बनले त्यांना वगळून प्रथमच नोकरी शोधणाऱ्यांची संख्या 2.27 कोटी इतकी आहे. एनपीएस डाटानुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात 8.23 लाख नवीन भागधारक नवीन पेन्शन योजनेत सामील झाले. यामध्ये राज्य सरकारच्या अंतर्गत 4.64 लाख भागधारक, अशासकीय क्षेत्रातील 2.30 लाख भागधारक आणि केंद्र सरकारमधील 1.29 लाख भागधारकांचा यामध्ये समावेश आहे, असे सांगितले जाते.