उभ्या ट्रकला भरधाव कारने दिली धडक
वृत्तसंस्था/ कोईम्बतूर
तामिळनाडूच्या सालेममध्ये बुधवारी पहाटे एका रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना रस्त्याच्या कडेला असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सालेम-कोईम्बतूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला एक ट्रक उभा होता. बुधवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पेरुन्थुराईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कारने मागून ट्रकला धडक दिली.
दुर्घटनेवेळी कारमधून 8 जण प्रवास करत होते. कारमधील सर्व प्रवासी हे ईरोड जिल्ह्यातील ईगुंरचे रहिवासी होते. धडक अत्यंत जोरदार असल्याने कारचे छप्परच उडून गेले. मृतांमध्ये एक वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. पोलिसांनी या दुर्घटनेची नोंद करत सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले आहेत.