ढिगाऱयाखाली 10 हून अधिक लोक गाडल्याची भीती, 15 जणांवर रुग्णालयात उपचार
पाटणा / वृत्तसंस्था
बिहारमधील मोतिहारी येथे शुक्रवारी संध्याकाळी वीटभट्टीच्या धुराडय़ात (चिमणी) स्फोट होऊन ते कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. आजुबाजुच्या परिसरात काम करणारे मजूर या धुराडय़ाच्या ढिगाऱयाखाली गाडले गेले. शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेतर 8 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतांमध्ये वीटभट्टीच्या मालकाचाही समावेश आहे. मदत व बचावकार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून 15 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच अजूनही 10 हून अधिक लोक ढिगाऱयाखाली गाडले गेल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
रामगढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंपापूर गावाजवळ शुक्रवारी अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीसप्रमुख आणि जिल्हाधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी संबंधित यंत्रणांना मदत व बचावकार्यात सहभागी होण्याचे निर्देश दिले. धुराडय़ाचा अर्धा भाग कोसळण्याची भीती कायम असल्याने अतिशय सावधगिरीने बचावकार्य राबविले जात होते. तसेच स्थानिकांना घटनास्थळी जाण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला होता. धुराडे कोसळत असताना आजूबाजूला 50-60 लोक काम करत असल्याचे एका जखमीने सांगितले. प्राथमिक तपासात धुराडय़ाच्या कमकुवतपणामुळे हा स्फोट झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वीटभट्टीचे मालक मो इर्शाद आणि नरीरगीर गावचे रहिवासी अनिल बैठा या दोन मृतांची ओळख पटल्याचे जिल्हाधिकारी एस. के. अशोक यांनी सांगितले. अन्य मृतांची ओळख पटलेली नाही. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयाचे संचालक डॉ. सुजित कुमार यांनी सांगितले.