प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील नागरिकांकडूनच परिसर अस्वच्छ करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचरा पसरलेला पाहायला मिळत आहे. येथील काँग्रेस रोडवर फूटपाथच्या बाजूने नागरिकांकडून कचरा टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे.
शहर स्वच्छतेचे काम महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडे देण्यात आले आहे. महापालिका स्वच्छता विभागाचे कर्मचारी आपले काम व्यवस्थितरीत्या करत असले तरी नागरिकांच्या अशा वागण्यामुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे. कचराकुंडीतील कचरा घेऊन जाण्याबरोबरच रस्त्यावर आणि इतरत्र टाकण्यात आलेल्या कचऱयाची देखील महापालिकेकडून उचल करण्यात येते.
मात्र, आता फूटपाथ आणि फुटपाथच्या बाजूनेदेखील टाकण्यात आलेल्या कचऱयाची उचल करण्याची वेळ त्यांच्यावर आली असून नागरिकांनी जाणूनबुजून सर्वत्र कचरा करू नये. आणि स्वच्छता कर्मचाऱयांच्या कामात भर घालू नये, अशी अपेक्षा आहे. नागरिकांनी हॉटेल, दुकान आणि घरातील कचरा घंटागाडीकडे द्यावा आणि इतरत्र कचरा टाकण्याऐवजी कचराकुंडीत टाकावा, अशी मागणी होत आहे.