काणकोणच्या गणेशोत्सव मंडळांना सूचना, बहुतेक सार्वजनिक गणेशोत्सव दीड दिवस
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण तालुक्यातील एक-दोन वगळता बहुतेक सर्व सार्वजनिक गणेशोत्सव यंदा दीड दिवसाचे असतील. या उत्सवांत देखील कोरोना महामारीच्या संदर्भात सरकारने जे निर्बंध घालून दिलेले आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन काणकोणचे मामलेदार विमोद दलाल यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले आहे. काणकोणच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी मामलेदार दलाल, सामाजिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. जुझे तावारीस, डॉ. दिवाकरजी वेळीप, पोलीस उपनिरीक्षक स्वदेश देसाई उपस्थित होते.
सरकारने जे निर्बंध घालून दिलेले आहेत त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने 4 फुटांपेक्षा अधिक उंचीची गणेशमूर्ती बनवू नये, जेणेकरून मूर्ती आणण्याच्या आणि विसर्जनाच्या वेळी त्रास होणार नाही. पूजेच्या वेळी 10 पेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश करू नये, प्रसाद वितरण मर्यादित स्वरूपातच करण्यात यावे. गणेशभक्तांना तीर्थप्रसाद देणे शक्यतो टाळावे. गणेशमूर्तीसमोर सजावट, देखावा, रोषणाई टाळतानाच कार्यक्रमांना कात्री लावावी. ज्या ठिकाणी गणेशमूर्ती स्थापन करण्यात येणार आहे त्या जागी देखील दर्शनाला येणाऱयांवर नियंत्रण ठेवावे, अशा सूचना दलाल यांनी केल्या.
या तालुक्यातील पोळे चौपाटी, माशे येथील वाकडी नदी, पैंगीण येथील गालजीबाग नदी, गालजीबाग किनारा, अर्धफोंड नदी, पाळोळे, राजबाग, पाटणे किनारा, आगोंद किनारपट्टी, साळेरी नदी, गावडोंगरी येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानची तळी तसेच खोतीगाव येथील तळी येथे वाडय़ावरील घरगुती उत्सवांतील गणेशमूर्तींचे सामूहिकरीत्या विसर्जन करण्यात येत असते. या ठिकाणी गर्दी न करता त्यासाठी स्थानिक पातळीवर गट करण्यात यावेत. त्याचप्रमाणे चित्रशाळेतून गणेशमूर्ती आणतेवेळी देखील गर्दी न करण्याची सूचना मामलेदारांनी यावेळी केली. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांच्या दृष्टीने धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवांत शक्यतो लहान मुलांना आणू नये, अशी सूचना आरोग्याधिकारी डॉ. तावारीस यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत दिवाकर पागी, आनंद ताशिलदार, आनंद पागी, कृष्णा वेळीप यांनी भाग घेऊन विविध सूचना केल्या.
या बैठकीला कृष्णा वेळीप, माटवेमळ सार्वजनिक गणेश मंडळ, दिवाकर पागी, पाळोळे भूमिपुरुष गणेश मंडळ, आनंद पागी, साळेरी गणेशोत्सव मंडळ, रमेश वेळीप, वागोण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आनंद ताशिलदार, गावडोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अजय फळदेसाई, चावडी गणेशोत्सव मंडळ, जयेंद्र तुबकी, वडामळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कुशवंत भगत, चार रस्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, किरण ना. गावकर, आगोंद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कृष्णा देविदास, खोतीगाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सचिन नाईक, लोलये पंचायत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रत्नाकर धुरी, राजबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व अन्य सदस्य हजर होते. ही सर्व मंडळे नोंदणीकृत असून आर्थिक बोजा सांभाळण्यासाठी सरकारने या गणेशोत्सव मंडळांना अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी आनंद ताशिलदार यांनी यावेळी केली.