चेन्नईसाठी प्लेसिस-ऋतुराज गायकवाडच्या फॉर्ममुळे फलंदाजी मजबूत, गोलंदाजीत मात्र किंचीत चिंता
शारजाह / वृत्तसंस्था
तळाच्या स्थानी फेकले गेल्याने प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या सनरायजर्स हैदराबादसमोर आज (गुरुवार दि. 30) आयपीएल साखळी सामन्यात टेबलटॉपर्स चेन्नई सुपरकिंग्सचे तगडे आव्हान असणार आहे. यापूर्वी मागील लढतीत हैदराबादने फॉर्ममध्ये नसलेला स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरला वगळण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. त्याची पुनरावृत्ती आज पुन्हा होऊ शकते. ही लढत आज सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाणार आहे.
डेव्हिड वॉर्नरला या हंगामात 24.37 च्या सरासरीने केवळ 181 धावा जमवता आल्या असून येथे त्याला दुसऱयांदा संघातील जागा गमवावी लागली. वॉर्नरने 2016 मध्ये कर्णधार या नात्याने आयपीएल जेतेपद जरुर मिळवून दिले. पण, मागील 5 वर्षांच्या कालावधीत त्याची जादू बरीच ओसरली असल्याचे त्याच्या फॉर्मवरुन स्पष्ट होत राहिले आहे. याचा फटका त्याला आता संघातील जागा गमावण्याच्या रुपाने मोजावी लागली आहे. तूर्तास, वॉर्नरचे हैदराबाद प्रँचायझीमधील स्थान कायम राहणार का, याबद्दल देखील साशंकता निर्माण झाली आहे.
रॉयचे लक्षवेधी पदार्पण
इंग्लिश सलामीवीर जेसॉन रॉयने पदार्पणाची संधी मिळाल्यानंतर याचा पुरेपूर लाभ घेतला असून त्याची 60 धावांची खेळी लक्षवेधी ठरली होती. नंतर विल्यम्सनने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले होते. हैदराबादने तो सामना 9 चेंडूंचा खेळ बाकी राखत जिंकला होता. सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार व जेसॉन होल्डर यांनी शेवटच्या 17 चेंडूत एकही चौकार दिला नाही. शिवाय, धोकादायक संजू सॅमसनला बाद केले, ते निर्णायक ठरले होते. पाच महिन्यातील त्यांचा हा पहिलाच विजय ठरला होता.
यंदा हैदराबादला प्ले-ऑफ गाठणे कठीण असले तरी यासाठी उर्वरित चारही सामने जिंकून अन्य निकाल आपल्याला अनुकूल लागावेत, अशी अपेक्षा त्यांना करावी लागणार आहे. हैदराबादचा संघ विदेशी खेळाडूंवरच अधिक अवलंबून राहत आला असून स्वदेशी खेळाडूत वृद्धिमान साहा व प्रियम गर्ग यांच्यावर त्यांची प्रामुख्याने भिस्त असणार आहे.
संभाव्य संघ
सनरायजर्स हैदराबाद ः केन विल्यम्सन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, शेरफेन रुदरफोर्ड, वृद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, रशिद खान, विजय शंकर, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, उर्मान मलिक, बसिल थम्पी, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, अब्दुल समद, जे. सुचित, जेसॉन होल्डर, विराट सिंग, प्रियम गर्ग, केदार जाधव, मुजीब-उर-रहमान, जेसॉन रॉय.
चेन्नई सुपरकिंग्स ः महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अम्बाती रायुडू, केएम असिफ, दीपक चहर, डेव्हॉन ब्रेव्हो, फॅफ डय़ू प्लेसिस, इम्रान ताहीर, एन. जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सॅन्टनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, सॅम करण, आर. साई किशोर, मोईन अली, के. गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी. हरी निशांत.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
चेन्नई संघ काही प्रयोग राबवणार का?
गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान असलेल्या आणि प्ले-ऑफमधील स्थान जवळपास निश्चित केलेल्या चेन्नई सुपरकिंग्स संघासाठी काही प्रयोग राबवून पाहण्याची येथे नामी संधी असेल. यापूर्वी रविवारी केकेआरविरुद्ध झालेल्या लढतीत चेन्नईने शेवटच्या चेंडूवर 2 गडी राखून निसटता विजय संपादन केला, त्यावेळी त्यात अष्टपैलू रविंद्र जडेजाची 8 चेंडूतील 22 धावांची धडाकेबाज खेळी निर्णायक ठरली होती. आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज फॅफ डय़ू प्लेसिस व युवा भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाड यांनी उत्तम केमिस्ट्री दाखवली आहे तर मोईन अली, सुरेश रैना व अम्बाती रायुडू यांनीही यथोचित योगदान दिले आहे. यापैकी सलामीवीर ऋतुराज गायकवाड कारकिर्दीतील सर्वोत्तम बहरात असून मागील 3 लढतीत त्याने अनुक्रमे 40, 38 व नाबाद 88 धावांचे योगदान दिले आहे.
त्या तुलनेत चेन्नईची गोलंदाजी मात्र काहीशी दुबळी राहिली असून हैदराबाद याचा लाभ घेणार का, हे आज प्रत्यक्ष सामन्यात स्पष्ट होईल. विंडीजचा स्टार अष्टपैलू डेव्हॉन ब्रेव्होला यापूर्वी केकेआरविरुद्ध लढतीतून विश्रांती देण्यात आली होती. मात्र, सॅम करणने 4 षटकात 56 धावा दिल्याने त्याच्याऐवजी पुन्हा ब्रेव्होचे पुनरागमन झाले तर आश्चर्याचे कारण नसेल, असे चित्र आहे.