इस्लामिक स्टेटची घोषणा – इस्लामच्या विरोधात जाणाऱयाला संपवू
वृत्तसंस्था / नांगरहार
इस्लामिक स्टेट खुरासान या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानला धमकी देत शेजारी देशाला उद्ध्वस्त करणे आमचे पहिले लक्ष्य असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या दुरवस्थेसाठी पूर्णपणे पाकिस्तान जबाबदार आहे. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट असूनही इस्लामिक कायदे लागू होत नसल्याचे इस्लामिक स्टेटकडून म्हटले गेले आहे.
इस्लाम किंवा धर्मग्रंथाच्या विरोधात जाणाऱया देशांना दहशतवादी संघटनेने ताकीद देखील दिली आहे. आमचे पहिले लक्ष्य शरीया कायदा लागू करणे आहे. आमच्याकडे लढण्यासाठी फार काही नाही, पण माझ्या हातात काहीही येता मी पाकिस्तानशी लढण्यास जाणार असल्याचे आयएसआयएस-केचा प्रमुख दहशतवादी नजीफुल्लाने सांगितले आहे.
तालिबानच्या राजवटीत परवड
अफगाणिस्तानात जे काही होतेय, त्यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे. याचमुळे आमचे पहिले लक्ष्य पाकिस्तानला उद्ध्वस्त करणे आहे. अफगाणिस्तानच्या 80 टक्के हिस्स्याला नियंत्रित करतो असे तालिबानचे शासक म्हणत होते, पण अडीच महिने उलटून गेल्यावरही तालिबानला इस्लामिक राजवट लागू करण्यास यश आलेले नाही. याचमुळे आम्ही अफगाणिस्तानात आयएसआयएस-केची सुरुवात केली असल्याचे नजीफुल्लाने म्हटले आहे.
तालिबानवर नाराज
आयएसआयएस-के या दहशतवादी संघटनेने अलिकडेच दोन शिया मशिदींमध्ये आत्मघाती हल्ले घडवून आणले होते. या दोन्ही हल्ल्यांमध्ये 200 हून अधिक लोक मारले गेले होते. तालिबानने या हल्ल्यांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. तेव्हापासून आयएसआयएसने तालिबानच्या विरोधात आघाडी उघडली आहे. आपण पूर्वीसारखे कट्टर राहिलो नसल्याचा विश्वास तालिबान जागतिक समुदायाला देऊ पाहत आहे. आयएसआयएसला तालिबानची ही भूमिका मान्य नाही. शरीयाचे कायदे कठोरपणे लागू करण्याची मागणी दहशतवादी संघटनेची आहे. तर तालिबान सद्यस्थितीत असे पाऊल उचलण्याच्या तयारीत नाही.
अखुंदजादाकडे नेतृत्व नाही
नजीफुल्लाने तालिबानवर मोठा आरोप केला आहे. तालिबानचे काही नेते कट्टर नेत्यांना मागे ठेवू पाहत आहेत. शरीया कायद्याची मागणी करणारे आणि तालिबानचे संस्थापक मुल्ला उमर याचा 2013 मध्ये मृत्यू झाला होता. ही माहिती दोन वर्षांपर्यंत लपवून ठेवण्यात आली होती. आम्ही तालिबानच्या मोठय़ा नेत्यांना मुल्ला उमरचा व्हिडीओ दाखविण्यास सांगितले, पण तो कधीच दाखविला गेला नाही. तसेच सद्यकाळात तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्लाह अखुंदजादालाही वाळीत टाकण्यात आले आहे. तालिबानचे काही नेते शक्तिशाली देशांच्या दबावामुळे शरीया कायदा लागू करण्यास टाळाटाळ करत असल्याचे विधान नजीफुल्लाने केले आहे.
6 देशांचे दहशतवादी सामील
आमची संख्या कमी असली तरीही आयएसआयएस-केजवळ अफगाणिस्तानात मोठा हल्ला घडवून आणण्याची क्षमता असल्याचे 24 वर्षीय नजीफुल्लाने म्हटले आहे. अफगाण भूमीवर तालिबानच्या सदस्यांची संख्या सुमारे 70 हजार इतकी आहे. तर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनुसार आयएसआयएस-केच्या दहशतवाद्यांची संख्या 2 हजारांच्या आसपास आहे. तरीही आयएसआयएस-केचे दहशतवादी तालिबानला वरचढ ठरत आहेत. आमच्या संघटनेत चीन, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, पाकिस्तान, इराण आणि रशियातून दाखल झालेले दहशतवादी असल्याचा दावा नजीफुल्लाने केला आहे.